राष्ट्रवादीच्या दणक्यानंतर बाधितांना लुटणाऱ्या हॅास्पिटलने परत केले अडीच लाख

प्रफुल्ल भंडारी
Wednesday, 21 October 2020

तक्रारीनुसार बिलांची तपासणी करण्यासाठी नियुक्त चौकशी समितीच्या अहवालात रूग्णांना ४ लाख ९८ हजार रूपये जास्त आकारल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील मयूरेश्वर हॅास्पिटलने कोरोना १४ बाधितांवर उपचार करून त्यांच्याकडून जास्त आकारलेले २ लाख ४८ हजार ९१४ रूपये परत केले आहेत. दौंडमधील राष्ट्रवादी पक्षाने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही रक्कम परत करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बोरीपार्धी (ता. दौंड) येथील मयूरेश्वर हॅास्पिटल या अधिग्रहित रूग्णालयाच्या वतीने देऊळगाव गाडा स्थित डेडिकेटेड कोविड हॅास्पिटल केयर सेंटरमध्ये वाढीव बिलांची वसुली आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जात नसल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती.

तक्रारीनुसार बिलांची तपासणी करण्यासाठी नियुक्त चौकशी समितीच्या अहवालात रूग्णांना ४ लाख ९८ हजार रूपये जास्त आकारल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. त्याचबरोबर चौकशी दरम्यान १०४ रूग्णांवर उपचार झालेले असताना फक्त ७७ जणांच्या फाईल्स तपासणीसाठी देणे, आवश्यक नोंदी न ठेवणे, आदी एकूण १७ गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.

प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी सदर रक्कम वसूल करण्याचे आदेश दिल्यानंतर मयूरेश्वर हॅास्पिटलने बोरीपार्धीचे तलाठी व्ही. एम. भांगे यांच्याकडे १४ धनादेश जमा केले. १४ बाधितांना एकूण २ लाख ४८ हजार ९१४ रूपये धनादेशाद्वारे परत देण्यात आले आहेत. हॅास्पिटलकडून आणखी दोन लाख रूपये बाधित रूग्णांना देणे बाकी असून, त्याची प्रक्रिया सुरू आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'त्यांना धडा मिळेल..'उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने अडवणूक करणाऱ्या हॅास्पिटलच्या विरोधात असून, त्यांच्या सुचनांनुसार कारवाई झाली आहे. कोरोनाग्रस्तांना लुटणाऱ्यांना आणि चुकीचे वागणाऱ्या हॅास्पिटल चालकांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील या कारवाईमुळे नक्की धडा मिळेल, असे मत पैसे मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वैशाली नागवडे यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on hospital robbing corona patients