वाळूमाफिया तहसिलदारांनाच म्हणतात, 'आमची वाहने घेवून कशी जाता ते बघतो' मग काय... 

डी. के. वळसे पाटील
Friday, 16 October 2020

आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांना धमकी देणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात कारवाई : ६३ लाख ५५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त 

मंचर : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे घोडनदी पात्रा जवळ विनापरवाना वाळू व वाळू चोरण्यासाठी वापरलेले दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर, चाळा, डंपर, पोकलेन, दोन कार असा एकूण ६३ लाख ५५ हजार रुपये किमतीचा ऐवज छापा टाकून जप्त केला आहे. तहसीलदार रमा जोशी व महसूल पथकाला “येथून आमची वाहने घेवून कशी जाता ते बघतो?”. अशी धमकी दिल्याच्या आरोपावरून तीन वाळू माफियांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

याप्रकरणी तूषार शांताराम टेके, आकाश शेटे (रा. वडगाव काशिंबेग, ता. आंबेगाव), डंपर चालक गणेश माणिक शिंदे (रा.वारजे माळवाडी, खानवस्ती, ता.हवेली) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश शिंदेला मंचर पोलिसांनी अटक केली असून. अंधाराचा फायदा घेवून टेके व शेटे पळून गेले आहेत. फरारी झालेल्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

आंबेगाव–जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी सारंग कोडलकर यांना वाळू चोरीविषयी माहिती मिळाली होती. त्यांनी ताबोडतोब घटनास्थळी पथक पाठविले. तहसीलदार रमा जोशी, पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, मंडल अधिकारी योगेश पाडळे, कामगार तलाठी दीपक करदुले, विकास पोटे, दीपक हरल, पोलीस नाईक ए. बी. मडके, एम. डी. भालेकर, सागर गायकवाड, एस. व्ही. गवारी, डी. एस. डुंबले या पथकाने  नियोजनबद्द कारवाई केली.

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

झालेल्या कारवाईचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे. या परिसरात वाळूमाफियांच्या विरोधात झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या परिसरात वाळू चोरी सुरु होती. पण वाळू माफिया मात्र  गुंगारा देऊन यंत्रसामुग्रीसह पळून जात होते. त्यामुळे महसूल यंत्रणा हतबल झाली होती. प्रांत अधिकारी सारंग कोडलकर यांनी खास गुप्तचर यंत्रणा कार्यान्वित करून वाळू माफियांच्या विरोधात धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सागर  खबाले करत आहेत.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action in Manchar against sand mafia