esakal | pune : नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर "एमपीडीए' अंतर्गत कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर "एमपीडीए' अंतर्गत कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुन्हेगारी टोळ्या तयार करून खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे करीत नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत दोन गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगार हे वारजे माळवाडी व भवानी पेठेतील असून त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

शेखर रविंद्र खवळे (वय 20, रा.रामनगर, वारजे) व अरबाज ऊर्फ बबन इक्‍बाल शेख (वय 23, रा.भवानी पेठ) यांच्यासह 41 जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खवळे हा वारजे माळवाडी पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, दंगा, बेकायदा शस्त्र बाळगणे या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहे.

मागील पाच वर्षामध्ये खवळेविरुद्ध 8 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्यांच्या दहशतीमुळे भितीपोटी नागरीकही तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी संबंधीत आरोपीविरुद्ध स्थानबद्दतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविला होता.

दरम्यान, खडक पोलिसांच्या अभिलेखावर असणाऱ्या अरबाज ऊर्फ बबन इक्‍बाल शेख याच्याविरुद्धही खडक, लष्कर, समर्थ पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्याविरुद्ध पाच वर्षात 13 गुन्हे दाखल आहेत. शेखविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई व्हावी, यासाठीचा प्रस्ताव खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पाठविला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी खवळे व शेखविरुद्धच्या "एमपीडीए'च्या प्रस्तावाची पडताळणी घेतली. त्यानंतर संबंधीत प्रस्तावाला मंजुरी दिली. मागील एक वर्षात 41 जणांविरुद्ध "एमपीडीए'अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

loading image
go to top