esakal | अतिक्रमण करुन, विनापरवाना घराचे बांधकाम करताय का? सावधान, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण करुन, विनापरवाना घराचे बांधकाम करताय का? सावधान, कारण...

ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेत अतिक्रमण करुन, विनापरवाना घऱाचे बांधकाम कराल तर सावधान...आपल्या विरोधात फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो.

अतिक्रमण करुन, विनापरवाना घराचे बांधकाम करताय का? सावधान, कारण...

sakal_logo
By
जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेत अतिक्रमण करुन, विनापरवाना घऱाचे बांधकाम कराल तर सावधान...शासकीय जागेत अतिक्रमण करुन बेकायदा घऱे बाधणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पंचायत समितीने दिले आहेत. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हवेली पंचायत समितीच्या आदेशानुसार नायगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका स्वाती अशोक राजगुरू यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, लोणी काळभोर पोलिसांनी कुंदन मुकींदा जगताप, दिगंबर संतु लोंढे, पुजा आनंद कांबळे, विठ्ठल किसन चौधरी, दामोदर दगडू थोरे, गुराप्पा सावळा काळे (सर्व रा. आदर्श कॉलनी समोर नायगाव) व अमित आनंद गदरे, कावेरी सतीश चौधरी (रा. काळभैरवनाथ पिर, नायगाव) या आठ जणांच्या विरोधात शासकीय जागेत अतिक्रमण करुन, विनापरवाना घऱाचे बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव ग्रामपंचायत हद्दीतील गायरान गट क्रमांक ३५ या शासकीय जागेत कुंदन जगताप, दिगंबर लोंढे, पुजा कांबळे, विठ्ठल चौधरी, दामोदर थोरे, गुराप्पा काळे, अमित गदरे व कावेरी चौधरी या आठ जणांनी अतिक्रमण करुन घऱे बांधली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वरील गट नंबर ३५ हा पुर्वी प्रयागधान ग्रामपंचायत हद्दीत होता. मात्र हा गट काही दिवसांपुर्वीच नायगाव ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेला आहे. वरील गट नायगाव ग्रामपंचायत हद्दीत येण्यापुर्वीच वरील आठ जणांनी बेकायदा घरे बांधली होती. वरील गट नायगाव ग्रामपंचायतीकडे वर्ग होताच, वरील गटात अतिक्रमण करणाऱ्या वरील आठ जणांना अतिक्रमण काढण्याबाबत लेखी सूचना दिल्या होत्या. मात्र वरील आठही जणांनी ग्रामपंचायतीच्या नोटीशीला न जुमानता, घऱाचे काम चालूच ठेवले होते.

दरम्यान वरील आठही जणांना अतिक्रमण हटविण्यासाठी हवेलीचे तहसिलदार सुनिल कोळी व हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनीही लेखी आदेश दिले होते. मात्र हवेली तहसिलदार कार्यालय, हवेली पंचायत समिती कार्यालय व नायगाव ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस मिळूनही. आठही जणांनी चालढकल सुरु ठेवल्याने, अखेर त्यांच्यावर लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'शासकीय जागेतील अतिक्रमणाबाबत तक्रारी आल्यास गुन्हे दाखल करणार'- याबाबत अधिक बोलताना हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के म्हणाले, ''नायगाव ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला ही बाब खरी आहे. या सर्वांना अतिक्रमणे काढण्यासाठी वारंवार बजावले होते. मात्र त्यांनी अतिक्रमणे काढण्यास नकार दिल्याने, ग्रामपंचायतीला पोलिस कारवाई करावी लागली. नायगाव प्रमाणेच हवेली तालुक्यातील ज्या ज्या गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याबाबत तक्रारी येतील, त्या सर्वच अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येतील.

( संपादन : सागर डी. शेलार)