आदीशक्‍तीच्‍या जागरास सुरवात

आदीशक्‍तीच्‍या जागरास सुरवात
Published on: 

आदिशक्तीच्या जागरास उत्साहात प्रारंभ

जिल्ह्यात देवीच्या मंदिरांसह घराघरांत घटस्थापना; वातावरण भक्तिमय

सातारा, ता. ११ : भक्‍ती आणि शक्‍तीचे प्रतीक असणाऱ्या आदिमाया, आदिशक्तीच्या जागरास आजपासून जिल्‍ह्याच्‍या विविध भागांत माेठ्या उत्‍साहात सुरुवात झाली. जिल्‍ह्यातील पुरातन, तसेच ऐतिहासिक देवीच्‍या मंदिरांत, घराघरांत घटस्‍थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. आगामी नऊ दिवस होणाऱ्या आदिशक्तीच्या जागरामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार आहे.
सातारा शहरातील घराघरांत आणि विविध मंदिरात आज सप्‍तधान्‍याची पेरणी करत घटस्थापना करण्‍यात आली. यावेळी प्रथेप्रमाणे घटास नागवेलीच्‍या पानाची पहिली माळ अर्पण करत आदिशक्तीची पूजा करण्‍यात आली. शहरातील विविध भागात सार्वजनिक मंडळांच्‍या वतीने दुर्गामूर्तीची प्रतिष्‍ठापना करण्‍यात येते. यासाठीच्‍या तयारीत गेल्‍या काही दिवसांपासून मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते गुंतले होते. मंडप, सजावट या कामांबरोबरच कुंभारवाड्यात तयार करण्‍यात येणाऱ्या मूर्तीच्या रंगरंगोटीवर देखील त्‍यांचे लक्ष होते. घटस्थापनेनंतर मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ढोलताशांच्‍या गजरात कुंभारवाड्यात मूर्ती नेण्‍यासाठी दुपारनंतर दाखल होण्‍यास सुरुवात झाली.
रंगरंगोटी पूर्ण झाल्‍यानंतर मूर्ती आभूषणांनी सजवत कार्यकर्त्यांनी ढोलताशा, संबळ, हलगीच्‍या कडकडाटात ती मंडळांकडे नेण्‍यास सुरुवात केली. ढोलताशांचा गजर आणि अंबामातेच्‍या नावाचा जयजयकार करत नेण्‍यात येणाऱ्या मूर्ती राजवाडा बसस्‍थानक येथे आणण्‍यात येत होत्‍या. यानंतर त्‍याठिकाणाहून त्‍या जल्‍लोषी वातावरणात, फुलांच्‍या उधळणीत आणि फटाक्‍यांच्‍या आतषबाजीत मूर्ती नेण्‍यास सुरुवात झाली.
रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागांतील ७४ मंडळांनी दुर्गामूर्ती नेत त्‍यांची प्रतिष्ठापना केली. प्रथेप्रमाणे ललिता पंचमीपासून शहरातील विविध मंदिरांत तसेच मंडळांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी दांडियाचे देखील आयोजन करण्‍यात आले आहे.
जलमंदिर पॅलेस, मंगळवार तळे तसेच पोलिस मुख्‍यालयासमोरील तुळजाभवानी तसेच अजिंक्‍यतारा किल्‍ल्‍यावरील मंगळाई आणि तटाखालील मंगळाई, फोडजाई मंदिरासह इतर सर्वच ठिकाणाच्‍या मंदिरांत घटस्थापनेने नवरात्रास सुरुवात झाली. नवरात्रातील उपवासांमुळे फळांची आवक वाढली असली तरी मागणीमुळे त्‍यांचे दर देखील वाढीस लागले आहेत. फुलांचेही दर देखील वाढले आहेत.
...........
57097
सातारा : राजवाडा परिसरात ढोलताशांच्‍या निनादात दुर्गामूर्ती प्रतिष्‍ठापनेसाठी नेण्‍यात आली. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा).
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com