Adivasi Katkari Community : आता आदिवासी कातकरी ही होणार 'मतदार राजा'!

सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे येथून मतदार नोंदणीला सुरुवात; 'सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची तत्परतेने कार्यवाही.
Katkari Community
Katkari CommunitySakal

सिंहगड - देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल पंच्याहत्तर वर्षे उलटून गेल्यानंतर अखेर सिंहगड परिसरातील आदिवासी कातकरी नागरिकांपर्यंत 'लोकशाही' पोहोचली असून आदिवासी बांधवांनाही निवडणुका आल्यानंतर 'मतदार राजा' म्हणून हक्काची ओळख मिळणार आहे.

सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी तत्परतेने कार्यवाही केली असून आजपासून डोणजे व गोऱ्हे बुद्रुक येथील आदिवासी कातकरी नागरिकांची मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल शंभर नागरिकांची नोंदणी करण्यात आली असून घरोघरी जाऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

खडकवासला, एनडीए गेट, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, कोंढणपूर, वरदाडे, सोनापूर, बहुली, आगळंबे व पानशेत परिसरातील अनेक गावांमध्ये दुर्गम ठिकाणी वास्तव्य करणारा आदिवासी कातकरी समाज मतदानाच्या हक्कापासून वंचित असल्याबाबत सकाळ'ने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजेश देशमुख यांचे लक्ष वेधले होते.

त्यानुसार खडकवासला व भोर-वेल्हा-मुळशी या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत तातडीने विशेष मोहीम राबवून अठरा वर्षांवरील सर्व आदिवासी कातकरी नागरिकांची मतदार नोंदणी पूर्ण करुन घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. अवघ्या दोन दिवसांत याबाबत कार्यवाही सुरू झाली असून डोणजे व गोऱ्हे बुद्रुक येथील कातकरी बांधवांची मतदार नोंदणी करुन घेण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या सूचनेनुसार हवेली तालुक्याचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवासला मंडळ अधिकारी हिंदुराव पोळ, डोणजेचे कामगार तलाठी उमेश देवघडे, बिएलओ सचिन राठोड व अश्विनी वांबिरे यांनी या विशेष मोहिमेची डोणजे येथून सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी तब्बल शंभर आदिवासी कातकरी नागरिकांची नोंदणी करण्यासाठी फॉर्म भरून घेण्यात आले आहेत.

या मोहिमेला आदिवासी कातकरी नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून शंभर टक्के मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी प्रत्येक कातकरी वस्तीवर जाऊन हे काम प्राधान्याने करुन घेण्यात येणार असल्याचे मंडळ अधिकारी हिंदुराव पोळ यांनी सांगितले.

'सकाळ'मुळे आम्हाला मतदानाचा हक्क मिळणार आहे, सगळ्या कातकरी समाजाच्या वतीने सकाळ'चे आभार. काही अपवाद वगळता अनेकांची मतदार म्हणून अद्याप नोंद नव्हती. भविष्यात राखीव जागेवर संधी मिळाल्यास आमच्या समाजाचा प्रतिनिधी निवडणूकही लढविणार असून त्यामुळे आम्हाला आमच्यासाठी सुधारणा करता येतील.'

- नीरा वाघमारे, कातकरी कार्यकर्त्या.

'खडकवासला महसुली मंडळातील डोणजे व गोऱ्हे बुद्रुक येथील आदिवासी कातकरी नागरिकांची मतदार नोंदणी आज सुरू करण्यात आली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वांची नोंद पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. इतर महसुली मंडळातही ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

- किरण सुरवसे, तहसीलदार हवेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com