Vidhan Sabha 2019 : घटलेल्या मतदानाचे खापर प्रशासनावरच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 October 2019

मतदार याद्यांमधील गोंधळ, जोडून आलेल्या सुट्या, मतदानासाठी स्लिप पोचविण्यात जिल्हा प्रशासनाला आलेले अपयश आदी कारणांमुळे मतदान घटल्याचा निष्कर्ष शहरातील राजकीय वर्तुळातून काढण्यात आला. मतदार जागृती करूनही मतदानाचे प्रमाण घटल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

विधानसभा 2019  
पुणे - मतदार याद्यांमधील गोंधळ, जोडून आलेल्या सुट्या, मतदानासाठी स्लिप पोचविण्यात जिल्हा प्रशासनाला आलेले अपयश आदी कारणांमुळे मतदान घटल्याचा निष्कर्ष शहरातील राजकीय वर्तुळातून काढण्यात आला. मतदार जागृती करूनही मतदानाचे प्रमाण घटल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीपेक्षा शहरात मतदान कमी झाले आहे. विधानसभा निवडणूक अगदी वेळेवर जाहीर झाली. त्यात उमेदवारांना प्रचाराला वेळ कमी मिळाला. त्यामुळे शहरातील वातावरण तापलेच नाही. परिणामी, निवडणुकीबद्दल उदासीनता निर्माण झाल्याचाही सूर राजकीय वर्तुळातून व्यक्त झाला.

याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘मतदार याद्यांतील घोळामुळे नागरिक वैतागले. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या बूथ आणि केंद्रांवरील याद्यांत गेल्याच्या शेकडो घटना घडल्या. त्यामुळे नाव शोधायचे कोठे, असा प्रश्‍न मतदारांना पडला. तसेच, ईव्हीएमबद्दल मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात साशंकता आहे. त्यामुळेही मतदान नकोच, असा सूर निर्माण झाला अन्‌ मतदान घटले.’’

काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ म्हणाले, ‘‘मतदार याद्यांत दुबार नावे मोठ्या प्रमाणात आली. याबरोबरच सत्ताधाऱ्यांबद्दल निर्माण झालेला रोष मतदारांनी मतदान न करता व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांच्या दहशतीमुळेही अनेकांनी मतदानात भाग घेतला नाही. मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे उद्योग-व्यवसाय, नोकऱ्यांना प्राधान्य दिले अन्‌ मतदानाकडे अनेकांनी पाठ फिरविली.’’

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी, तोंडावर आलेली दिवाळी, शनिवार-रविवार या लागून आलेल्या सुट्या, याचा परिणाम कमी मतदान होण्यावर झाला, असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असतो. या दिवशी कामाला प्राधान्य दिले जाते, तसेच ईव्हीएमबद्दलही मतदारांत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेही मतदान घटले.’’

काँग्रेसचे मोहन जोशी यांनी मंदीसदृश परिस्थिती, लागोपाठच्या सुट्या आणि मतदार याद्यांतील घोळ, या कारणांमुळेच मतदान घटल्याचे सांगितले. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपनेते बाबू वागस्कर म्हणाले, ‘‘मतदारांपर्यंत मतदानाच्या स्लिप पोचविण्यात जिल्हा प्रशासन कमी पडल्याची कबुली जिल्हाधिकाऱ्यांनीच दिली आहे. मतदार याद्या सदोष असल्यामुळे अनेक ठिकाणी दुबार नावे होती. केंद्र कोठे आहे, याचीही माहिती नागरिकांना मिळत नव्हती. त्यामुळे एकूण मतदान प्रक्रियेबद्दल उदासीनता निर्माण झाली आहे.’’

नेते म्हणतात...
चंद्रकांत पाटील (प्रदेशाध्यक्ष, भाजप) - कोथरूडच्या विकासाची जबाबदारी माझी असून, ती कोथरूडकरांनीच सोपविली आहे. या निवडणुकीत माझे मताधिक्‍य दीड लाखांपुढे राहणार आहे. त्यावरून साऱ्या चर्चा थांबल्या आहेत. केवळ कोथरूड नव्हे, तर संपूर्ण शहराच्या विकासाला प्राधान्य देणार आहे.

चेतन तुपे (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) - पुण्यातील सर्व मतदारसंघांतील निवडणुकीचा निकाल हा लोकांच्या बाजूने राहणार आहे. ही निवडणूक विरोधकांनी नव्हे, तर लोकांनी लढविली आहे. त्यामुळे निकालाची घोषणा केवळ औपचारिकता ठरेल. मतदार याद्यांमधील गोंधळ, मतदान केंद्रांमधील अपुऱ्या सुविधांमुळे मतदान कमी होत आहे.

माधुरी मिसाळ (शहराध्यक्ष, भाजप) - शहरातील विकासकामे, भविष्यातील विकासाचे नवे मॉडेल, याला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. साहजिकच, पुणेकर विकासाची जबाबदारी महायुतीच्या उमेदवारांकडे सोपविणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या नव्या आठ आमदारांचे मताधिक्‍य किती असेल, याची चर्चा आहे.

संजय मोरे : (शहरप्रमुख, शिवसेना) - शिवसैनिकांनी ताकदीनिशी काम केले असून, त्याचा परिणाम निकालातून दिसून येईल. सर्व जागांवर महायुतीचे वर्चस्व कायम राहील. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration responsible for declining voting