इंजिनिअरींगसह सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार

ब्रिजमोहन पाटील
Friday, 27 November 2020

सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया प्रवेश डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चालू होईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

पुणे : सीईटी सेल मार्फत घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षांचे निकाल पाच डिसेंबर पर्यंत जाहीर केले जातील. तसेच या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया प्रवेश डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चालू होईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'कोरोना'मुळे इंजिनीअरिंग, फार्मसी एग्रीकल्चर यांची एमएचटी-सीईटी तसेच विधी, आर्किटेक्टर, हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड, एमएड यासह इतर सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. या परीक्षा अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यभर घेण्यात आल्या. मात्र, त्यापैकी केवळ हॉटेल मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चर या सीईटी निकाल आॅक्टोबर महिन्यात जाहीर झाले. तर एमबीए सीईटीचा निकाल हा मे महिन्यात जाहीर करण्यात आला आहे. 

एमएचटी-सीईटी झाल्यानंतर त्याचा निकाल लगेच लागेल अशी अपेक्षा होती. मात्र, मराठा आरक्षणामुळे सीईटी सेल कडून कोणत्याही परीक्षेचा निकाल जाहीर केला नाही. राज्य सरकारने एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. त्यानंतर राज्यातील खोळंबलेली प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मात्र, अद्याप उच्च शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले नसल्याने याकडे पालक व विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. एमएचटी- सीईटीचा निकाल नोव्हेंबरच्या शेवटी लागण्याची शक्यता अाहे. 

नदीत बुडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

सीईटी परीक्षांच्या निकालाबाबत व प्रवेशाबाबत स्पष्टता येण्यासाठी शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केले आहे. यामध्ये "राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व प्रवेश परीक्षांचे निकाल ५ डिसेंबर पर्यंत सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल, अशी माहिती दिली आहे". त्यामुळे सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The admission process for all courses, including engineering, will begin soon