स्वमग्नतेच्या निदानासाठी आता "एडॉस-2'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या वतीने स्वमग्नतेच्या निदानासाठी "ऑटिझम डायग्नॉस्टिक ऑबझर्व्हेशन शेड्यूल 2' (एडॉस 2) या "टेस्ट'ची
सुविधा सुरू करण्यात आली आहे.

पुणे : प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या वतीने स्वमग्नतेच्या निदानासाठी "ऑटिझम डायग्नॉस्टिक ऑबझर्व्हेशन शेड्यूल 2' (एडॉस 2) या "टेस्ट'ची
सुविधा सुरू करण्यात आली आहे. जगभरात स्वमग्नतेचे प्रमाण 68 मुलांमागे एक असे आहे. त्यात मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण अधिक आहे; तर 75 टक्के मुलांमध्ये अध्ययन अक्षमता असू शकते. यासाठी मुलांना स्वमग्नता आहे का, हे तपासण्यासाठी लागणारी ही आधुनिक प्रणाली या संस्थेनी सुरू केल्याची माहिती संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा साधना गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या वेळी संस्थेचे संचालक सुभाष केसकर, विश्‍वस्त संध्या जोशी, शुभदा पेंढारकर आदी उपस्थित होते. गोडबोले म्हणाल्या, "देशात एडॉस-2 ही खर्चिक चाचणी प्रणाली यापूर्वी उपलब्ध नव्हती. या चाचणीतून स्वमग्नतेची संभाव्यता (स्पेक्‍ट्रम) असलेल्या व्यक्तीची संभाषण क्षमता, खेळ, सामाजिक आंतरक्रिया, विशिष्ट आवड याविषयीचे अचूक निदान करून आवश्‍यक ती उपचारपद्धती ठरविता येते.

स्पेक्‍ट्रमवर असण्याची शक्‍यता असणाऱ्या 12 महिन्यांच्या बोलू न शकणाऱ्या बाळापासून ते व्यवस्थित बोलणाऱ्या कुठल्याही मोठ्या व्यक्तीसाठी हे साधन वापरता येते. याचा वापर करत मुलांमधील स्वमग्नतेचे प्रमाण ठरवून त्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवू शकतो.''

काय आहेत कारणे -
स्वमग्नतेस कारणीभूत असू शकणाऱ्या काही कारणांपैकी मुख्य कारण आनुवंशिकता आहे. याव्यतिरिक्त गरोदर असताना वाढलेला रक्तदाब, मधुमेह यासाठी दिली जाणारी विशिष्ट औषधे, आई-वडिलांचे वाढलेले वय, अल्कोहोलचा वापर, कुपोषण किंवा प्रसूतीदरम्यान होणारी गुंतागुंत यासारखे विविध कारणेसुद्धा असू शकतात.

मुलांची काही लक्षणे
- नजरेला नजर न देणे
- आवाजाला प्रतिसाद न देणे
- कल्पनासृष्टी नसणे
- स्वतःमध्ये मग्न राहायला आवडते
- 50 टक्के मुलांना कधीही बोलता न येणे
- भावनिक विकास समस्या व इंद्रियांचे समतोल एकत्रीकरण नसणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ADOS for Autism diagnosis