
राखी पौर्णिमेच्या दिवशीच पुण्यात FDAची मोठी कारवाई; 150 लिटर भेसळयुक्त तूप जप्त
पुणे : राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी आणि FDAच्या प्रशासनाने १५० लिटर भेसळयुक्त तूप जप्त केले आहे. पुण्यातील कात्रज भागातील एका गोडाऊनवर छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
(FDA Action Pune Updates)
दरम्यान, राखी पौर्णिमेनिमित्त अनेकजण मिठाई आणि खाद्यपदार्थांची खरेदी करत असतात. त्या पार्श्वभूमीवर अन्न आणि मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते त्यामुळे अन्न व औषध प्रशासाने कारवाई करत १५० लिटर भेसळयुक्त तूप जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिंदर सिंग देवरा असे या व्यक्तीचे नाव असून तो डालडा (जे वनस्पती तूप म्हणून ओळखले जाते) आणि जेमिनचे तेल एका केमिकलच्या साह्याने एकत्र करून त्यावर प्रक्रिया करत भेसळ करत असे.
पोलिसांनी केलेल्या कारवाई सदर आरोपीकडून अनेक केमिकल देखील जप्त करण्यात आले असून त्याच्या टेस्टिंगसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत. या कारवाईत तब्बल १ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून देवरा यांनी हे भेसळयुक्त तुप कुठल्या दुकानदारांना विकले आहे याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे.