
आफ्रिका आणि भारत यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘एएफइंडेक्स २०२३’ हे पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन येथे आयोजित करण्यात आले आहे.
Joint Military Exercises : 'एएफइंडेक्स २०२३' हा संयुक्त लष्करी सराव होणार पुण्यात
पुणे - आफ्रिका आणि भारत यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘एएफइंडेक्स २०२३’ हे पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन येथे आयोजित करण्यात आले आहे. या संयुक्त लष्करी सरावाच्या अनुषंगाने प्रथमच आफ्रिकी देशांच्या लष्करी प्रमुखांची परिषद देखील पुण्यात पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजेच यामध्ये संरक्षण मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या परिषदेच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचे दर्शन घडविणारे प्रदर्शन देखील होणार आहे. यामध्ये संरक्षण उत्पादनात उद्योगांची कामगिरी आणि देशाची होणारी वाटचाल हे दाखविण्यात येणार आहे. अशी माहिती ब्रिगेडिअर जेम्स थॉमस यांनी शनिवारी दिली.
‘एएफइंडेक्स २०२३’ हे २१ ते ३० मार्च दरम्यान होणार असून यामध्ये २४ आफ्रिकी देशांच्या लष्करी तुकड्या सहभागी होणार आहेत. तर दहा दिवस चालणाऱ्या या सरावाची सुरवात मंगळवारपासून (ता. २१) औंध मिलिटरी स्टेशन येथील परदेशी प्रशिक्षण नोड येथे होणार आहे. या अभ्यासादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या धोरणानुसार मानवतावादी भूसुरुंग विरोधी मोहीम, शांतता प्रस्थापित कारवाई अशा विविध पैलूंबाबत संयुक्त सराव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिगेडिअर थॉमस बोलत होते. या प्रसंगी कर्नल मोहीत ग्रोवर व इतर लष्करी अधिकारी उपस्थित होते.
संयुक्त लष्करी सरावाच्या महत्त्वाबाबत अधोरेखित करताना ब्रिगेडिअर थॉमस म्हणाले, ‘‘संयुक्त सराव ‘आफ्रिका-इंडिया मिलिटरीज फॉर रिजनल युनिटी’च्या (अमृत) संकल्पनेला चालना देत, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांवर भर देईल. हे सामूहिक प्रयत्न सर्व सहभागी राष्ट्रांमधील सैन्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित करेल. संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार शांतता राखण्यासाठी आयोजित संयुक्त मोहिमांमध्ये सामरिक कौशल्ये, कवायती, कार्यपद्धती सक्षम करणे, तसेच शांतता राखण्याच्या मोहिमांमध्ये जीवितहानी आणि मालमत्तेचा धोका टाळणे, आफ्रिकन राष्ट्रांच्या सैन्याशी समन्वय साधणे, चांगले संबंध निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. ‘एएफइंडेक्स’मार्फत संयुक्त राष्ट्रांच्या धोरणानुसार जागतिक शांतता राखण्यासाठी सहभागी राष्ट्रांचे लष्कर सक्षम असल्याचा संदेश जगाला यामाध्यमातून दिला जाईल.
‘आफ्रिका-इंडिया चीफ कॉन्क्लेव्ह’ -
पहिल्यांदाच या संयुक्त लष्करी सरावानिमित्त यंदा भारतासह आफ्रिकन देशांच्या लष्कर प्रमुखांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद २८ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये भारत-आफ्रिका संरक्षण भागीदारी, भारत संरक्षण उद्योग संभाव्यता आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी योगदान या विषयावर चर्चा सत्रे पार पडतील. परिषदेत २१ आफ्रिकी देशांचे लष्करप्रमुख आणि प्रमुखांचे प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत.
जागतिक परिस्थिती आणि नवीन सुरक्षा आव्हानांसाठी भारत-आफ्रिका संबंधांच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाचे व्यसपीठ ठरेल. यामुळे सहभागी राष्ट्रांना आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकत्र येण्याची संधी मिळेल. तसेच सहभागी राष्ट्रांना भारतीय ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत सारख्या संकल्पनेंतर्गत संरक्षण उद्योगात सुरू असलेल्या उपक्रमांविषयी देखील माहिती दिली जाणार आहे. परिषदेदरम्यान विविध संरक्षण उत्पादन, उद्योगांना आफ्रिकी देशांचे प्रतिनिधी भेट देतील. असे यावेळी कर्नल ग्रोवर यांनी नमूद केले.