जरेवाडी गावात आली पाच वर्षानंतर एसटी 

khed
khed

दावडी - जरेवाडी या खेड तालुक्याच्या पुर्व भागातील गावाला जाणाऱ्या रस्त्यांची अवजड वाहनांमुळे प्रचंड दुरवस्था झाली होती. त्यामुळे एसटी महामंडळाने जरेवाडी गावात एसटी पाठवणे पाच वर्षांपासुन बंद केले होते. मात्र ग्रामस्थांनी स्वखर्चाने रस्ता दुरूस्ती केल्यानंतर  पाच वर्षीने जरेवाडी गावात एसटी आली आहे.

जरेवाडी हे राजगुरूनगर पासुन आठ किलोमीटर अंतरावरील गाव. जरेवाडी जवळील गावांमध्ये क्रशर व्यवसाय जोरात सुरू असल्याने क्रश सँड व खडी वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे जरेवाडीच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. अवजड वाहनांमुळे मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्डयांमधुन वाहने चालवणे अशक्य बनल्यामुळे एसटी महामंडळाने जरेवाडी ग्रामस्थांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी पाठवणे शक्य होणार नाही अशी पाच वर्षापुर्वी कल्पना दिली होती. एसटी बंद झाल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी व वयोवृद्द तसेच रूग्णांची खुप गैरसोय होत होती. मात्र खराब रस्त्यांमुळे एसटी गावात येत नव्हती. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहून आपुलीची आपण करावी सोडवण या उक्तीप्रमाणे ग्रामस्थ व वाघेश्वर फांऊडेशन यांनी एकत्र येत चार किलोमीटर रस्त्याचे मुरूमीकरण आणि मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेतला. स्वखर्चाने चार किलोमीटर रस्त्याचे काम पुर्ण केले आणि एसटी महामंडळाशी पुन्हा पत्रव्यवहार करून पुन्हा एसटी चालू करण्याची विनंती केली.

ग्रामस्थांच्या प्रयत्नांना एसटी.महाडळाने प्रतिसाद देत जरेवाडी गावात एसटी पाठवण्याचा निर्णय घेतला. मंगळवार (दि.2) रोजी सकाळी अकरा वाजता जरेवाडी गावात पाच वर्षानंतर एसटी आली. त्यामुळे ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. एसटीचे आगमन झाल्यावर महिलांनी एसटीचे चालक, वाहक व एसटीचे औक्षण केले. ग्रामस्थांनी एसटीला हार घालून पुजा केली व पेढे वाटून आनंद साजरा केला. जरेवाडी ते खेड या मार्गावर दिवसातून तीन वेळा एसटीच्या फेऱ्या होणार आहेत. एसटी सुरू झाल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी, वुद्ध नागरिक व ग्रामस्थांची सोय झाली असुन ग्रामस्थांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे. यावेळी राजगुरूनगर आगारप्रमुख उज्ज्वला टाकळकर, बजरंग जरे, मल्हारी जरे, अंकुश जरे, पोलीस पाटील अश्विनी राक्षे, विलास जरे, मंगेश राक्षे, निलेश जरे, काळूराम करंडे, अमोल जरे, रंगनाथ जरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com