

शिक्षक भरतीचे स्वरूप बदलले; आगळगावची परंपरा कायम
यंदा पवित्र पोर्टलद्वारे नऊ जणांची निवड; गावातील ९० टक्के घरांत शिक्षक
प्रशांत घोडके : सकाळ वृत्तसेवा
बार्शी, ता. ४ : शिक्षक भरतीचे स्वरूप बदलले, भरतीसाठी पवित्र पोर्टल आले; मात्र आगळगावची शिक्षक घडविण्याची परंपरा अजूनही कायम आहे. यंदाच्या पवित्र पोर्टलद्वारे झालेल्या मुलाखतीविना थेट शिक्षक भरतीत गावातील तब्बल नऊ जणांची निवड झाली आहे. याशिवाय मुलाखतीद्वारे होणाऱ्या भरतीच्या प्रतीक्षेतही गावातील दहा ते पंधरा उमेदवार आहेत. त्यामुळे शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यभर ‘शिक्षकांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आगळगावच्या या परंपरेचा नवा अध्याय अधोरेखित झाला आहे.
अवघ्या साडेसहा हजार लोकसंख्येच्या या गावाने आजवर सुमारे दीड ते पावणेदोन हजार शिक्षक राज्याला दिले आहेत. गावातील जवळपास ९० टक्के घरांमध्ये किमान एक-दोन शिक्षक आहेत. काही कुटुंबांमध्ये तर दहा-बारा, पंधरा, तर काहींमध्ये वीसपर्यंत शिक्षक कार्यरत आहेत.
गावाने जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांपासून महाविद्यालयांपर्यंत शिक्षक आणि प्राध्यापक घडविले आहेत. सध्या काही तरुण डी.एल.एड., बी.एड.चे प्रशिक्षण घेऊन ही परंपरा पुढे नेत आहेत. वैद्य, उकिरडे, डमरे आदी कुटुंबांमध्ये शिक्षकांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे.
.........
दोन शाळांचा मोठा वाटा
स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावात असलेली जिल्हा परिषद शाळा आणि कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी १९५८ मध्ये सुरू केलेले लोकसेवा विद्यालय यांनी शिक्षकांची पिढी घडविण्यात मोठी भूमिका बजावली. गावातील सर्वांत ज्येष्ठ शिक्षक लिंबराज डमरे हे १०१ वर्षांचे होते. अहमदाबाद महापालिकेच्या शाळेतही गावातील शिंदे गुरुजी शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज गावात सुमारे ३०० ते ४०० सेवानिवृत्त शिक्षक आहेत. गावातील सध्याचे आणि सेवानिवृत्त शिक्षक एकत्र येऊन वाचनालयाला बळकटी देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रांसाठी मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न करीत आहेत.
...
शिक्षकांची मुलेही विविध क्षेत्रांत
शिक्षक म्हणून कार्यरत राहिल्यानंतर गावातील अनेकांनी राजकारणासह विविध क्षेत्रांतही ठसा उमटविला. गरड दांपत्याने सेवानिवृत्तीनंतर गावचे सरपंच, उपसरपंचपद भूषविले. खासगी शाळेतील किरण मोरे आणि पोपट डमरे जिल्हा परिषद सदस्य झाले. शिक्षण सहसंचालक तथा पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष औदुंबर संपतराव उकिरडे, मंत्रालयातील अवर सचिव सुनील विठ्ठलराव उकिरडे, हुडकोचे संचालक धनराज मदन गरड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष कृष्णाथ पवार, अजय मदन गरड हे शिक्षकांची मुले आहेत. सागर सुनील गडगडे धाराशिव येथे शिक्षण विस्तार अधिकारी, तर दिनेश मोरे पुण्यात उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.