अकरावी अॅडमिशन: दीड महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया तत्काळ चालू करा; अभाविपचं आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील एक लाख सात हजार ३० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

पुणे : गेल्या दीड महिन्यांपासून रखडलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरु करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (पुणे महानगर) वतीने माध्यमिक शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 85 तोळे सोन्याचा सुवर्णसाज!

ही प्रवेश प्रक्रिया चालू नसल्याकारणाने अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. तसेच पालक वर्ग त्रस्त आहेत. आतापर्यंत जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. त्यातील ८३ हजार ७२७ अर्ज लॉक्ड करण्यात आले आहेत. त्यातील ८३ हजार ३२८ अर्ज व्हेरिफाय झाले आहेत. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील एक लाख सात हजार ३० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ३० हजार ५५६ विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतला आहे. परंतु ही प्रवेश प्रक्रिया स्थगित केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. 

अकरावीची प्रवेश प्रक्रिया स्थगित होऊन दीड महिना लोटला तरी अद्याप याबाबत सरकारने कोणताच निर्णय घेतला नसल्याने विद्यार्थ्यांवरील प्रवेशाचा ताण वाढत आहे. या निषेधार्थ विद्यार्थी परिषदेने हे आंदोलन केले.

पुणे झेडपी कोरोना रुग्णांत राज्यात 'अव्वल'

"अकरावी प्रवेश रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सूरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले, मात्र त्यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयात उपस्थित नव्हते. अन्य राज्यांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पडलेली असून, त्यांचे शैक्षणिक वर्ष देखील सुरू झाले आहे. मात्र आपल्या राज्यात अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत शासनाने निर्णय घेतलेला नाही, याबाबत सरकार उदासीन आहे,"
- अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

"दहावीला चांगले गुण मिळाले, त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत नंबर लागला आणि त्याचवेळी महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. प्रवेशानंतर काही दिवसांत महाविद्यालय सुरू होईल, अशी आशा होती, पण प्रवेशप्रक्रिया रखडल्याने सगळे ठप्प झाले आहे. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन महाविद्यालय कधी सुरू होणार, ही चिंता सतावू लागली आहे."
- एक विद्यार्थी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation organized by ABVP demanding immediate start of 11th admission process