मदनवाडी तलावामध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मुंडन, बोंबाबोंब

bhigwan
bhigwan

भिगवण (पुणे) : निरा व भिमा नद्या दुथडी भरुन वहात व जिल्ह्यातील धरणे भरलेली असताना इंदापुर तालुक्यातील मदनवाडी तलावांमध्ये पक्ष्यांना देखील पिण्यासाठी पाणी नाही. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी मदनवाडी येथील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. 29) तलावांमध्येच ठिय्या मांडून मुंडन व बोबांबोंब करुन शासनाचा निषेध केला. चालु आवर्तनांमध्ये सर्वात प्रथम मदनवाडी तलावांमध्ये पाणी सोडा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

इंदापूर तालुक्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मदनवाडी तलाव मागील अनेक दिवसांपासुन कोरडा आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबुन असणाऱ्या मदनवाडी, सिध्देश्वर निंबोडी, पिंपेळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या योजनाही अडचणीत आल्या आहेत. पाणी न सुटल्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. वारंवार मागणी करुनही जाणीवपुर्वक मदनवाडी तलाव भरण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत बुधवारी (ता. 29) सकाळी शेतकऱ्यांनी तलावांमध्ये ठिय्या मांडत स्वतःचे मुंडन करुन घेतले व शासनाच्या नावाने बोंब करत निषेध केला. यावेळी कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक रंगनाथ देवकाते, माजी सरपंच गणपत ढवळे, आबासाहेब बंडगर, कुंडलिक बंडगर, संतोष सोनवणे, संजय देवकाते, प्रशांत ढवळे, सुरेश देवकाते आदींसह शेतकऱ्यांनी मदनवाडी तलावांमध्ये ठिय्या आंदोलन केले. यावेळी गणेश साळुंके, तुकाराम सलगर, बाळु समगिर, दिलीप कदम, परबती बंडगर, नामदेव कदम, संजय कदम, शरद नरुटे, सुरज बंडगर आदी शेतकऱ्यांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला. शेतकऱ्यांनी शासनाच्या नावे बोंबाबोंब केली. 

याबाबत रंगनाथ देवकाते म्हणाले, मागील चार वर्षामध्ये मदनवाडी तलावांमध्ये पाणी सोडण्याबाबत दुजाभाव केला जात आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसाना बरोबर वीज बिलाचा बोजाही पडत आहे. सध्या धरणे भरलेली असताना मदनवाडी तलाव मात्र कोरडा ही शोकांतिका आहे. तातडीने पाणी सोडा अन्यथा तीव्र आंदोलन करु.

पाटबंधारे विभागाची असंवेदनशीलता 
मागील अनेक दिवसांपासुन मदनवाडी तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे. त्यासाठी निवेदनेही देण्यात आली आहे. बुधवारी संतप्त शेतकरी मदनवाडी तलावांमध्ये ठिय्या मांडुन मुंडन आंदोलन करत असल्याची कल्पना भ्रमनध्वनीद्दवारे अधिकाऱ्यांना दिली. शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश सुरु असताना पाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नाही. पाटंबंधारे विभागाच्या या असंवेदनशीलतेचा सर्वच स्तरातुन निषेध होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com