आदिवासी बांधवांनी हिरडा तर गोळा केला पण...

चंद्रकांत घोडेकर
Friday, 22 January 2021

An agitation was organized by the tribal community to decide the policy of the government regarding the purchase of hirda-आंबेगाव, खेड, मावळ, जुन्नर या तालुक्यातील आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे साधन हिरडा या पिकावर अवलंबून राहावे लागत असते. कोरोना या महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे हिरडा खरेदी झाली नाही. त्यामुळे बाळ हिरडा तात्काळ खरेदी सुरू करणे गरजेचे आहे

घोडेगाव : आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी यांच्यामार्फत बाळहिरडा खरेदी सुरू करण्यात यावे मागणीसाठी लक्षणीय उपोषण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिरसा क्रांती दलाच्या वतीने करण्यात आले. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे हिरडा खरेदी झाली नाही. या वर्षातील हिरडा खरेदीबाबत शासनाचे धोरण स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. यासंबंधीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारीया यांना देण्यात आले आहे.

म्हाडाच्या ५६४७ सदनिकांची आज Online सोडत; कोणाचं गृहस्वप्न होणार साकार?

निवेदनात म्हटले आहे की, ''आंबेगाव, खेड, मावळ, जुन्नर या तालुक्यातील आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे साधन हिरडा या पिकावर अवलंबून राहावे लागत असते. कोरोना या महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे हिरडा खरेदी झाली नाही. त्यामुळे बाळ हिरडा तात्काळ खरेदी सुरू करणे गरजेचे आहे.'' 

दरवर्षी एप्रिल, मे महिन्यामध्ये बाळहिरडा झाडाला येतो. कोरोना महामारीत आदिवासी नागरिकांनी एप्रिल, मे या दोन महिन्यात बाळहिरडा गोळा केला आहे, तो तसाच घरात पडून राहिला आहे. त्यामुळे मीठ मिरची व घरातील रेशन भरण्यासाठी पैसे हातात मिळेत नाहीत. त्यामुळे आदिवासी लोकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मुलाबाळाची लग्नाचा खर्च, शिक्षणाचा खर्च, कपडेलत्ता खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, जाण्यायेण्याचा खर्च या सर्वांची चणचण भासू लागली आहे. हातावर पोट असल्याने बाळहिरडा हेच आदिवासी लोकांचे महत्वाचे पीक आहे. ते तात्काळ खरेदी सुरू करावी.

बाळहिरडा याला आयुर्वेदामध्ये राजा असे संबोधले आहे. त्यामुळे आदिवासी लोकांना रोजगाराचे साधन म्हणून हिरडा हेच प्रमुख पिक आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे.

या आदिवासी महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी जनतेची वरई, नाचणी, सावा, हिरडा, खुराचणी ही पिके दरवर्षी खरेदी केली जात होती. मात्र दोन वर्ष आदिवासी महामंडळाच्या वतीने बाळ हिरडा खरेदी बंद असल्यामुळे नागरिकांना कोणतीही माहिती न देता अचानक पणे खरेदी बंद का केली हे समजले नाही. मात्र आदिवासी समाजाची यामध्ये नाहक गळचेपी होत आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने तात्काळ आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून बाळहिरडा खरेदी सुरू करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

...तर आमचा पायगुण वाईट आहे म्हणू नका ; अजित पवार यांची टोलेबाजी

बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष विजय आढारी, खेड तालुका कार्याध्यक्ष हरिभाऊ तळपे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले. त्यावेळी सचिव शशिकांत आढारी, उपाध्यक्ष संतोष भांगे, चिंधू आढळ, अभिजीत लांघी, महेश मराडे, नितीन गवारी, संजय लोंखडे, विष्णू शेळके, आदी नागरिक उपस्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An agitation was organized by the tribal community to decide the policy of the government regarding the purchase of hirda-