बारामतीत भुसार मालाचे लिलाव बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

बारामती - हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची शिक्षा व ५० हजारांचा दंड ठोठावण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आज येथील बाजार समितीतील भुसार मालाच्या अडत्यांनी लिलावासंदर्भात बेमुदत आंदोलन सुरू केले. त्यामुळे सुमारे २० लाखांचा व्यवहार आज ठप्प झाला. 

बारामती - हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची शिक्षा व ५० हजारांचा दंड ठोठावण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आज येथील बाजार समितीतील भुसार मालाच्या अडत्यांनी लिलावासंदर्भात बेमुदत आंदोलन सुरू केले. त्यामुळे सुमारे २० लाखांचा व्यवहार आज ठप्प झाला. 

राज्यात आधारभूत किमतीच्या खाली शेतमाल खरेदी करणे गुन्हा ठरणार आहे. याची घोषणा नुकतीच सरकारने केली. त्याचे परिपत्रक अजून बाजार समित्यांपर्यंत पोचलेले नाही. परंतु, अशा प्रकारचा कायदा व्यापाऱ्यांच्या मुळावर येणार असल्याने राज्यभरातील व्यापाऱ्यांनी ‘काम बंद’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज बारामतीतही व्यापारी- अडते असोसिएशनने बेमुदत बंद सुरू केला. आजपासून कोणताही शेतमाल खरेदी करायचा नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. येथे सोमवार हा भुसार मालाचा लिलावाचा दिवस असतो. परंतु, आज बाजार समितीचे कामच बंद राहिल्याने सुमारे अडीच हजार क्विंटल शेतमालाचे एरवी होणारे लिलाव आज होऊ शकले नाहीत. 

अडते असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर, उपाध्यक्ष विजय झांबरे, मिलिंद सालपे व त्यांचे सहकारी म्हणाले की, अशा प्रकारचा कायदा करताना राज्य सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्ण माल हमीभावात खरेदी करण्याची व्यवस्था करायला हवी होती. शेजारील कोणत्याही राज्यात असा कायदा नसताना महाराष्ट्रात तो केला जात असल्याने अनाकलनीय आहे. दरम्यान, येत्या ३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र ट्रेड फेअर असोसिएशनची बैठक पुण्यात होणार आहे. पुढील दिशा या बैठकीत होणार असल्याची माहिती सालपे यांनी दिली.

भाजीपाला विक्री सुरू
शेतीमालात भाजीपाल्यासाठी अजून हमीभाव नसल्याने भाजीपाला हा किमान आधारभूत किमतीच्या कायद्यात समाविष्ट नाही. त्यामुळे आज जळोची येथील उपबाजारातील भाजीपाला लिलाव मात्र नेहमीप्रमाणेच पार पडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture goods auction close