Agrowon Podcast: ‘ॲग्रोवन डिजिटल’चा सोनेरी गौरव ! शेत मार्केट पॉडकास्टला सुवर्णपदक
वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूज पब्लिशर्स (WAN-IFRA) तर्फे सकाळ माध्यम समूहाच्या ‘ॲग्रोवन’च्या ‘शेत मार्केट’ या पॉडकास्टला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. येथे गुरुवारपासून (ता. १६) सुरू झालेल्या दक्षिण आशियाई देशांच्या ‘डिजिटल मिडिया इंडिया २०२३’ परिषदेत हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
या दोन दिवसीय परिषदेत भारत तसेच दक्षिण आशियातील विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ डिजिटल’चे बिझनेस हेड स्वप्नील मालपाठक, कन्टेट हेड विश्वास पुरोहीत यांनी हा सन्मान स्वीकारला. ‘वॅन इफ्रा’च्या दक्षिण आशिया विभागाचे कार्यकारी संचालक मग्दूम मोहंमद आणि मुख्य कार्यपालन अधिकारी थॉमस जेकब यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला.
‘वॅन इफ्रा’ने २०२२ सालासाठीच्या विविध वर्गवारीतील दक्षिण आशियाई डिजिटल मिडिया पुरस्कारांची घोषणा अलिकडेच केली होती. माध्यम क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट पॉडकास्ट गटात सर्वोच्च सन्मान ‘ॲग्रोवन’च्या ‘शेत मार्केट’ पॉडकास्टला जाहीर झाला होता. शेतीमधले मार्केट इन्टेलिजन्स सांगणारे हे भारतातील पहिले पॉडकास्ट आहे. एकूण १३ गटांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कास्य असे तीन प्रकारचे पुरस्कार विविध माध्यमांना प्रदान करण्यात आले. त्यासाठी विविध दक्षिण आशियाई देशांमधून प्रवेशिका आल्या होत्या. सुवर्णपदक विजेत्यांना WAN-IFRA तर्फे दिल्या जाणाऱ्या वर्ल्ड डिजिटल मिडिया ॲवार्डच्या स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आला आहे.
मुद्रित अंकाबरोबरच ‘ॲग्रोवन डिजिटल’ माध्यमातूनही शेतकऱ्यांपर्यंत पोचतो आहे. एका क्लिकवर कृषी बाजारातील घडामोडी, दरातील चढ-उतार, महत्त्वाच्या बातम्या, तांत्रिक माहिती, चालू घडामोडींपासून ते शेती सल्ल्यापर्यंत सर्व अपडेट्स मिळतात. ‘ॲग्रोवन’ची वेबसाईट, ॲप, युट्यूब चॅनल, फेसबूक पेज, इन्स्टाग्राम आणि पॉडकास्ट यांवर ही माहिती उपलब्ध होते.
WAN-IFRA चे हे पुरस्कार माध्यम क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. त्यात बेस्ट पॉडकास्ट गटातील सर्वोच्च सन्मानासाठी शेतमार्केट पॉडकास्टची निवड करण्यात आली. या पुरस्कारामुळे ॲग्रोवनच्या या वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल प्रॉडक्टची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
२०२२ या वर्षासाठी एकूण १३ गटांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कास्य असे तीन प्रकारचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यासाठी विविध दक्षिण आशियाई देशांमधून प्रवेशिका आल्या होत्या. सुवर्णपदक विजेत्यांना WAN-IFRA तर्फे दिल्या जाणाऱ्या वर्ल्ड डिजिटल मिडिया अॅवार्डच्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे.
मार्केट इन्टेलिजन्स हा ॲग्रोवन डिजिटला गाभा आहे. त्याचाच एक भाग म्हणून दररोज शेतकऱ्यांना मार्केट बुलेटिन दिले जाते. त्यामध्ये कृषी बाजारातील घडामोडींचा धांडोळा घेतला जातो. शेतमालाचे भाव काय राहतील, माल विकावा की ठेवावा, मार्केट ट्रेन्ड, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारावर होणारा परिणाम यांचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीविषयीचा निर्णय घेण्यास मदत होते.