महिला बालकल्याण

महिला बालकल्याण
Published on

जिल्ह्यात आता एआय अंगणवाड्या

जिल्हा परिषदेचा निर्णय; बालकांचे पोषण, आरोग्य, आहाराची गुणवत्ता यांचे ट्रॅकिंग

सातारा, ता. ११ : जिल्ह्यात आता स्मार्ट अंगणवाडी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक डिजिटल उपकरणांच्या माध्यमातून बालकांचे पोषण, आरोग्य व आहाराची गुणवत्ता यांचे अचूक ट्रॅकिंग केले जाणार आहे. मुलांना वेळेवर आणि पौष्टिक आहार मिळतो का, यावरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. यासोबतच डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अंगणवाड्या अधिक सक्षम आणि स्मार्ट बनणार असून, त्यासाठी एआय अंगणवाडी हा उपक्रम जिल्हा परिषद यांच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती ऋतुजा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस महिला बालकल्याण अधिकारी नागेश ठोंबरे, शैलजा शिंदे, सारिका फाळके, अलका जगदाळे, पूजा मोरे, मृणाल पाटील, विजया थोरात, छाया जाधव, राजेश्वरी भोसले आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत महाराष्ट्रात पहिल्यादांच महिलांसाठी एआय प्रशिक्षण देण्यात येणार असून, हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांचा रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती ऋतुजा शिंदे यांनी दिली. दरम्यान समितीच्या सभेत विविध ठरावांना मंजुरी देऊन विषयपत्रिकेसह ऐन वेळच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. महिलांना स्वत:च्या व्यवसायाचे स्वत: एआयद्वारे मार्केटिंग करून स्वत:च्या व्यवसाय सुरू करता येईल. सायबर क्राइमपासून बचावासाठी महिलांच्या होणाऱ्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी महिलांना एआय प्रशिक्षणाबाबतचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मुली व महिलांसाठी ज्युडो कराटे प्रशिक्षण देण्यात येणार असून, ही योजना राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने सुरू करण्यात येणार असल्याचे ऋतुजा शिंदे यांनी सांगितले.

.............

चौकट
साखरेऐवजी गुळाचा वापर
सद्यःस्थितीमध्ये काही बालकांना जन्मत:च मधुमेहाचा त्रास उद्‍भवत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे पोषण आहारामध्ये गव्हाच्या खिरीमध्ये साखरेऐवजी पौष्टिक असणारा गूळ वापरण्याबाबतचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला आहे.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com