पुणे - बदलत्या तंत्रज्ञानाचा व कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) उपयोग पुणे पोलिसांकडून यंदा पुरेपुर केला जात असून गणेशोत्सवादरम्यान गर्दीचे व्यवस्थापन हे वेगवेगळ्या ‘एआय’ साधनांच्या मदतीने केले जाणार आहे..लाखो भाविक दरवर्षी शहरातील गणेशोत्सवाला भेट देतात, विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. त्यामुळे गर्दीचे नियमन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी पोलिस बळाबरोबरच या आधुनिक साधनांचा वापर होणार आहे.या उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने निगराणी कॅमेऱ्यांच्या मदतीने गर्दी, रस्ते आणि प्रमुख चौकांवर लक्ष ठेवले जाईल. सार्वजनिक ठिकाणांवरील सर्व कॅमेरे यांचे नियंत्रण हे पोलिसांच्या कक्षाकडे असेल. यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हिडिओ विश्लेषण प्रणाली कार्यरत असेल..ही प्रणाली अचानक वाढलेली गर्दी, भांडण किंवा संशयास्पद हालचाली ओळखून पोलिसांना लगेच सूचना देईल. इंटरनेटवर चालणारी जनसंदेश प्रणालीदेखील वापरली जाणार असून यामुळे मोठ्या परिसरात एकाच वेळी नागरिकांना माहिती, घोषणा, निर्देश देता येईल.वाहतूक नियंत्रणासाठी सीसीटीव्ही आणि एआय प्रणालींचा उपयोग होईल. त्याचबरोबर कोणत्या रस्त्यावर किती गर्दी आहे, कुठे पर्यायी मार्ग वापरावा याबाबत सतत माहिती मिळेल. त्याचबरोबर निगराणी वाहने आणि ड्रोनद्वारे आकाशातून गर्दीच्या रस्त्यांवर नजर ठेवली जाईल. तर चल निगराणी वाहने परिस्थितीनुसार स्थलांतरित करता येतील. याशिवाय पोलिस वाहनांना व पथकांना जीपीएस ट्रॅकर्स जोडले जातील, ज्यामुळे आपत्कालीन प्रसंगी जवळचे पथक त्वरित पाठवता येईल..हवाई सुरक्षेसाठी पोलिसांकडे ‘अँटी ड्रोन गन’ असेल. अवैध किंवा संशयास्पद ड्रोन परिसरात आढळल्यास ते तत्काळ निष्क्रिय करता येईल. याशिवाय पोलिसांमधील समन्वय साधण्यासाठी वायरलेस संचांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. या सर्व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित, शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडेल, असा विश्वास पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.