संसार उघड्यावर पडल्याचे अजितदादांना सांगताना दांपत्याचे अश्रू अनावर...

मीननाथ पानसरे
Friday, 5 June 2020

चक्रीवादळाने संसार उघड्यावर पडल्याची व्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगताना जुन्नर तालुक्यातील येणेरे येथील दांपत्याला अश्रू अनावर झाले. त्यावर अजित पवार यांनी थेट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन लावला

आपटाळे (पुणे) : चक्रीवादळाने संसार उघड्यावर पडल्याची व्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगताना जुन्नर तालुक्यातील येणेरे येथील दांपत्याला अश्रू अनावर झाले. त्यावर अजित पवार यांनी थेट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन लावला आणि संबंधित कुटुंबाला सर्वोतपरी मदत करण्यास सांगितले. त्यावर त्यांनीही तातडीने प्रस्ताव देण्याचे सांगत मदत करण्याचे आश्वासन दिले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोलमजुरी करत कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या जुन्नर तालुक्यातील येणेरे येथील ठाकरवाडी येथील बाळू बबन भालेकर व उज्ज्वला बाळू भालेकर या दाम्पत्याने तीन वर्षांपूर्वीच नव्या घराची स्वप्नपूर्ती साकारली. मात्र, बुधवार झालेल्या चक्रीवादळाने त्यांचे घरकुल पूर्णतः उद्धवस्त झाले. त्यांचा संसार उघड्यावर पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भालेकर कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अजित पवार माहिती विचारत असतानाच या दांपत्याला अश्रू अनावर झाले. 

बाळू बबन भालेकर हे मोलमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांची रुपाली व राहुल ही दोन मूले शिक्षण घेत आहेत. भालेकर यांचे घरकुलाच्या रूपाने स्वतःच्या घराचे स्वप्न तीन वर्षांपूर्वी साकार झाले. मात्र, वादळाच्या तडाख्याने भालेकर यांच्या घरकुलाचे पत्रे अँगलसह उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या परिस्थितीची पहाणी करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी थेट ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना फोन लावला. भालेकर यांना सर्वोतपरी मदत करण्याचे पवार यांनी मुश्रीफ यांना सांगिले. त्यावर मुश्रीफ यांनी तातडीने प्रस्ताव देण्याचे सांगत मदत करण्याचे आश्वासन दिले. या वेळो आमदार अतुल बेनके यांनी देखील मुश्रीफ यांना घटनेची माहिती दिली.

सरपंच तृप्ती ढोले व ग्रामस्थांनी अजित पवार यांना या कुटुंबाची माहिती दिली. तसेच पवार यांनी तहसीलदार हणमंत कोळेकर यांना संबंधित कुटुंबाला सहकार्य करण्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट ग्रामविकास मंत्र्यांना फोन लावल्याने उपस्थित ग्रामस्थांनी अजित पवार यांच्या धडाकेबाज कामाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar called Hasan Mushrif Directly to help the family