

प्रेरणेचा अखंड झरा...
आदरणीय अजितदादा आणि आदरणीय सुनेत्रावहिनी यांनी माझ्यासारख्या असंख्य छोट्या-मोठ्या उद्योजकांना केवळ प्रोत्साहनच दिले नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी दिली. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक नवउद्योजकांना नवी दिशा मिळाली, रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आणि स्थानिक उद्योगांना बळ मिळाले. उद्योजकांनी गुणवत्तेच्या बळावर आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर पुढे जावे, हा त्यांचा संदेश नेहमीच प्रेरणादायी ठरला. आपल्या आयुष्याला एखाद्या परिसाचा स्पर्श होतो आणि आपल्या करिअरचे सोने होते, तसेच माझ्या बाबतीतही झाले. दादांनी जो कमालीचा विश्वास टाकला त्याने आत्मविश्वास तर वाढलाच शिवाय करिअरलाही वेगळी दिशा मिळाली. दादांच्या या पाठिंब्याच्या जोरावर त्यानंतर मी कधी मागे वळून पाहिलेच नाही.
- श्री. जय पवार,
उद्योजक, बारामती
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काही भेटी अशा असतात, ज्या केवळ औपचारिक राहत नाहीत, तर त्या आयुष्याला नवी दिशा देतात. काही व्यक्ती आपल्या एका वाक्याने, एका सल्ल्याने किंवा एका विश्वासाने एखाद्याचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढवू शकतात. माझ्या आयुष्यात अशीच प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार.
आदरणीय अजितदादांना जवळून भेटण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग मला सन २०१५मध्ये आला. बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या एका शिबिरात माझे जिवलग मित्र श्री. अजय फराटे आणि त्यांचे वडील आदरणीय राजनभाऊ फराटे यांच्यासमवेत माझी दादांशी प्रथम भेट झाली. त्या काळात मी वॉटर ट्रीटमेंट क्षेत्रात नुकतीच माझ्या व्यवसायाची सुरुवात केली होती. व्यवसाय नवीन असल्यामुळे अनेक स्वप्ने होती, पण त्याचबरोबर भविष्याबाबत काहीशी अनिश्चितताही होती. त्या कार्यक्रमात राजनभाऊ फराटे यांनी माझी ओळख अजितदादांशी करून दिली. दादांनी अत्यंत आपुलकीने माझ्याकडे पाहत विचारले, ‘काय करतोस तू?’ मी नम्रपणे उत्तर दिले, ‘दादा, मी नुकतीच वॉटर ट्रीटमेंट क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आहे.’ माझे उत्तर ऐकल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मला मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘हा खूप चांगला व्यवसाय आहे. या क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होणार आहेत. प्रामाणिकपणे, गुणवत्तेची तडजोड न करता आणि सातत्याने काम करत राहा. नक्कीच यश मिळेल.’
त्यावेळी त्यांनी उच्चारलेले हे शब्द माझ्यासाठी केवळ प्रोत्साहन नव्हते, तर ते माझ्या पुढील व्यावसायिक प्रवासाचे मार्गदर्शक ठरले. आजही ते शब्द माझ्या मनात अक्षरशः कोरलेले आहेत. जेव्हा जेव्हा एखादे आव्हान समोर उभे राहिले, तेव्हा दादांचे तेच शब्द आठवले आणि पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली. त्या पहिल्या भेटीच्या वेळी मला अजिबात कल्पना नव्हती की, पुढील काळात याच क्षेत्रात आदरणीय अजितदादा मला पावलोपावली संधी देतील आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य उद्योजकावर विश्वास दाखवतील. त्यांनी माझ्याकडे केवळ एक व्यावसायिक म्हणून पाहिले नाही, तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उद्योजकाला संधी मिळाली पाहिजे, या भूमिकेतून कायम पाठबळ दिले.
आदरणीय अजितदादा आणि आदरणीय सुनेत्रावहिनी यांनी माझ्यासारख्या असंख्य छोट्या-मोठ्या उद्योजकांना केवळ प्रोत्साहनच दिले नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी दिली. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक नवउद्योजकांना नवी दिशा मिळाली, रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आणि स्थानिक उद्योगांना बळ मिळाले. उद्योजकांनी गुणवत्तेच्या बळावर आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर पुढे जावे, हा त्यांचा संदेश नेहमीच प्रेरणादायी ठरला.
सन २०१५ नंतर मला अजितदादांना अनेक वेळा भेटण्याची संधी मिळाली. प्रत्येक भेटीत त्यांनी माझ्या कामाची आपुलकीने चौकशी केली. ‘व्यवसाय कसा सुरू आहे, कोणत्या अडचणी आहेत, पुढील नियोजन काय आहे,’ अशा अनेक गोष्टी ते आवर्जून विचारत. एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणारा नेता प्रत्येक भेटीत इतक्या आत्मीयतेने संवाद साधतो, ही बाब माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहिली. माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. विशेषतः नांदेडसारख्या दूरच्या भागात विविध प्रकल्प राबवीत असतानाही दादांनी दिलेला आत्मविश्वास आणि मार्गदर्शन माझ्यासोबत कायम होते. प्रत्येक नवीन काम स्वीकारताना, प्रत्येक आव्हानाचा सामना करताना आणि प्रत्येक यश साजरे करताना त्यांच्या त्या पहिल्या भेटीतील शब्द माझ्या मनात पुन्हा पुन्हा घुमत राहिले.
फारसा अनुभव नसतानाही दादांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, या क्षेत्रातील माझा अभ्यास व माहिती बघून मी काहीतरी करून दाखवू शकेन, ही त्यांची भूमिका होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिक क्षेत्रात काम करताना माझे आर्थिक नुकसान कधीही होणार नाही, याची काळजी त्यांनी घेत मला जो पाठिंबा दिला तो आयुष्यात कधीही न विसरता येण्याजोगा आहे. आपल्या आयुष्याला एखाद्या परिसाचा स्पर्श होतो आणि आपल्या करिअरचे सोने होते, तसेच माझ्या बाबतीतही झाले. दादांनी जो कमालीचा विश्वास टाकला त्याने आत्मविश्वास तर वाढलाच शिवाय करिअरलाही वेगळी दिशा मिळाली. दादांच्या या पाठिंब्याच्या जोरावर त्यानंतर मी कधी मागे वळून पाहिलेच नाही. एक बारामतीकर मुलगा नव्याने काहीतरी करू पाहत आहे, त्याला संधी देणे गरजेचे आहे, हे ओळखून दादांनी मला जाणीवपूर्वक संधी दिली आणि मी नव्याने काही तरी करून दाखवू शकलो.
आज आदरणीय अजितदादा आपल्यात नसले, तरी त्यांनी दिलेली प्रेरणा, त्यांनी दाखविलेला विश्वास आणि त्यांनी दिलेले मार्गदर्शन माझ्यासारख्या असंख्य उद्योजकांच्या कार्यातून कायम जिवंत राहील. त्यांच्या एका सल्ल्याने माझ्या व्यावसायिक आयुष्याला नवी दिशा मिळाली आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला. अजितदादांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे मार्गदर्शन आणि सामान्य माणसावर ठेवलेला विश्वास हीच त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन करताना, त्यांनी दिलेल्या प्रेरणेचा वारसा जपण्याचा आणि प्रामाणिकपणे कार्य करत राहण्याचा संकल्प मी आजही कायम ठेवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.