
Ajit Pawar : उमेदवारी अर्जावर विचारल्यानंतर अजित पवार भडकले म्हणाले, 'मला मूर्ख समजू ...'
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापल आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी देणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजून ठरलं आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्ज भरण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीचा उमेदवार कधी जाहीर करणार या प्रश्नावर अजित पवार भडकले आणि म्हणाले “मला मूर्ख समजू नका, मी उद्याच उमेदवाराचे नाव सांगेन”. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार कोण असेल? याबाबतची उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची पुण्यात काल महत्त्वाची बैठक पार पडली.
बऱ्याच वेळ ही बैठक सुरु होती. या बैठकीत पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी कुणाला द्यायची या विषयावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. या बैठकीदरम्यान अजित पवार प्रसारमाध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. पण यावेळी त्यांना पत्रकारांनी उमेदवार आयात करणार का? असा प्रश्न विचारल्याने संतापले आणि मला मुर्ख समजू नका, असं ते रागात म्हणाले.
“उद्या सकाळी डांगे चौकात जमून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरला जाईल. अर्ज भरण्याच्यावेळी मी उपस्थित राहीन”, असंही अजित पवार म्हणाले आहेत. “आम्ही उद्या अर्ज भरणार आहोत. महाविकास आघाडीचा उमेदवार अर्ज भरेल. ऐनवेळीच उमेदवार घोषित करण्याचा प्रश्न नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
आता मी पुन्हा सगळ्यांना घेऊन बसलेलो होतो. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं. तर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ही निवडणूक आमची महाविकास आघाडी सर्वांनी मिळून लढवायची आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करुन आम्ही पुढे जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत जशी मी चर्चा केली, तशीच शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. घडाळ्याच्या चिन्हावरच उमेदवार असेल”, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
“पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मला एकदा विनंती केली. देवेंद्र फडणवीस यांनी एकदा विनंती केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. याबाबत मविआचे तीनही पक्षाचे वरिष्ठ निर्णय देतील त्यानुसार काम होईल”, असं देखील अजित पवारांनी सांगितलं आहे.
कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. याआधीच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या नाहीत. अंधेरीत उमेदवार दिला नाही. पण नोटाला मतं मिळाली”, असं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.