
Nashik News : टाकेद-धामणगाव रस्त्याच्या कामाला जोमाने सुरवात; आधुनिक DLC प्रणालीवर काँक्रिटीकरण
इगतपुरी : तालुक्याच्या पूर्व भागातील तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेदला जोडणारा व महत्त्वपूर्ण टाकेद-धामणगाव रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या जीवघेण्या खड्डेमय रस्त्याची दुरवस्था झाल्याने व पर्यायाने वाहनधारकांना दुसरा मार्ग नसल्याने येथील स्थानिक प्रवासी, वाहनधारक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी व व्यावसायिक अनेक वर्षांपासून खडतर प्रवास करत होते.
या रस्त्याच्या कामासंदर्भात खासदार हेमंत गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर या रस्त्याला मंजुरी मिळाली. सध्या या रस्त्याचे जोमाने काम सुरू आहे. (Work on Taked Dhamangaon road started Concretization on modern DLC system Urge motorists to adopt alternative routes Nashik News)
सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांच्यामार्फत ग्रामीण पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता, तहसीलदार इगतपुरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाडीवऱ्हे, सरपंच धामणगाव, सरपंच टाकेद ग्रामपंचायत आदींना या रस्त्याच्या कामकाजासाठी येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी, यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे.
उपविभागामार्फत या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत वाहनधारकांनी टाकेद, धामणगाव रस्त्याऐवजी पर्यायी धामणगाव, तातळेवाडी-गंभीरवाडी, अडसरे खुर्द, टाकेद रस्ता, धामणगाव, साकूर फाटा, पिंपळगाव, निनावी, भरवीर बुद्रुक, अडसरे टाकेद या रस्त्यांचा पर्यायी वापर करावा, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...
तसेच टाकेद-टाकेद खुर्द, गंभीरवाडी, धामणगाव किंवा टाकेद, तातळेवाडी, धामणगाव रस्त्यांचाही वाहनधारकांना पर्यायी वापर करता येईल. सदर टाकेद-धामणगाव रस्त्याचे काम सुरू असताना दिशादर्शक, सूचना डायव्हर्जन बोर्ड लावलेले असतानाही अनेक वाहनधारक नियमांची पायमल्ली करत अडथळा निर्माण करतात व पर्यायाने एकच मार्गावरून दुचाकी चालकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता ठेवला आहे त्या रस्त्यावरून चारचाकी वाहनधारकांची वर्दळ असते. त्यामुळे एकच कमी रुंदीच्या मार्गावरून वाहनधारक वाहने चालवितात.
त्यामुळे वाहतूक कोंडी होते. तरी या वाहतुकीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे व पर्यायी मार्गाने काही दिवस वाहतूक वाळवावी, अशी मागणी उपविभागीय अभियंता गजभिये, शाखा अभियंता तुषार मोरे, शाखा अभियंता एस. जी. वाघ, रस्ता ठेकेदार बाळा गव्हाणे, नीलेश जुंदरे, टाकेद सरपंच ताराबाई बांबळे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, धामणगाव सरपंच शिवाजी गाढवे व सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.
"टाकेद-धामणगाव रस्त्याचे कामकाज चांगल्या दर्जाचे होणार असून, वाहनधारकांनी रस्ता कामकाज पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा. विशेष करून चारचाकी वाहनधारकांनी या मार्गाचा अवलंब करा व रस्ता काँक्रिटीकरण कामकाजासाठी व्यत्यय येणार नाही, याची दक्षता घ्यावी."
-एस. जी. वाघ, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक