परिणामकारक कार्यवाही करावी; अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. तसेच ग्रामीण भागात प्लाझ्मादानबाबत जनजागृती करावी. तसेच प्लाझ्मादानसाठी स्वतंत्रपणे ऍप तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

पुणे - ""जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन अधिक परिणामकारक कार्यवाही करावी. तसेच, ग्रामीण भागासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमावेत,'' असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

कोरोनाच संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थितीत होते. विधान परिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीत सहभाग घेतला. खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार दिलीप मोहिते, सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे या वेळी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवार म्हणाले, ""कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळेल. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना ग्रामीण भागात समन्वयासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.'' 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनासोबतच पावसाळ्याच्या कालावधीतील आजारांबाबत अधिक दक्षता घ्यावी. कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. तसेच ग्रामीण भागात प्लाझ्मादानबाबत जनजागृती करावी. तसेच प्लाझ्मादानसाठी स्वतंत्रपणे ऍप तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वळसे-पाटील म्हणाले, ""ग्रामीण भागातील रुग्णालयांत आवश्‍यक सुविधांची वाढ करावी. रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून द्यावेत.'' या वेळी लोकप्रतिनिधींनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्‍यक सूचना केल्या. 

पवार म्हणाले.... 
- जम्बो रुग्णालयामुळे रुग्णांना दिलासा 
- प्लाझ्मादानबाबत व्यापक जनजागृती करावी 
- पावसाळ्यात अधिक खबरदारी घ्यावी 
- समन्वयासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावेत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar Measures meeting to prevent coronary infection