esakal | महत्वाची बातमी : यंदाच्या पंढरपुरच्या वारीबाबत अजित पवार म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

ajit-pawar.jpg

-यंदा पायी वारी नाहीच. 

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती; पादुका नेण्यासाठी साधनांचा विचार लवकरच. 

महत्वाची बातमी : यंदाच्या पंढरपुरच्या वारीबाबत अजित पवार म्हणाले...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आळंदी ः ""कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा संतांच्या पायी वारी निघणार नाही. संतांच्या पादुका सरकारमार्फत वाहनाने, हेलिकॉप्टर अथवा पर्याप्त सोयीद्वारे थेट पंढरपुरात दाखल करण्यात येईल. त्याबाबतचा निर्णय आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी कळविला जाईल,'' अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. त्यामुळे यंदा संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पायी पंढरपूरला जाणार नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा विचारात घेऊन आषाढीच्या वारीच्या स्वरूपाबाबत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार झाली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णाई, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आमदार सुनील शेळके, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे, डॉ. अभय टिळक, योगेश देसाई, देहू देवस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, संत सोपानकाका विश्वस्त ऍड गोपाळ गोसावी, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, ऍड. माधवी निगडे, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, नीलेश महाराज लोंढे, संजय घुंडरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बारामतीत हाॅटेलला परवानगी न मिळाल्यास

बैठकीत सर्व पालख्यांच्या सोहळाप्रमुख तसेच मानकऱ्यांची भूमिका सरकारच्या वतीने पवार यांनी ऐकून घेतली. संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत एकनाथ या चार पालख्या थेट दशमीला पंढरपुरात प्रवेश करतील. तर संत नामदेवरायांची पालखी पंढरपुरातच असते. आळंदी आणि देहू संस्थान तसेच वारकऱ्यांकडून पायी वारीबाबतचे विविध प्रस्ताव सरकारपुढे मागील बैठकीत सादर केले होते.आजही याबाबत सविस्तर चर्चा झाली. 

पवार म्हणाले, ""प्रत्येक संतांच्या पालख्यांसोबत वारकऱ्यांच्या दिंड्या नेता येणार नाही. पाच किंवा दहा वारकऱ्यांना पायी जाण्यास परवानगी दिली तर सर्वसामान्य भाविक या पायी जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये विठ्ठलाला पाहतात. त्याच श्रद्धेतून तो या वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर येईल. पायी दिंडी पाहण्यासाठीची गर्दी रोखणे नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. वारीची परंपरा जपली पाहिजे. तसेच वारीतील वारकऱ्यांवर सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, त्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवणे अशक्‍य आहे. अशावेळी प्रशासनाच्या सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांची दमछाक होईल. वारीत सर्व प्रकारच्या सोयी पुरवणे यंत्रणेवरील सध्याचा ताण पाहता सरकारला अडचणीचे आहे. यामुळे सर्व संतांच्या पादुकांचे प्रस्थान करून त्या-त्या गावात पादुका राहतील. त्यानंतर आषाढ शुद्ध दशमीला संतांच्या पादुका पंढरपुरात नेण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी बस, हेलिकॉप्टर पुरविण्याची जबाबदारी सरकार घेईल. मात्र, तत्कालीन परिस्थिती पाहून किती वारकरी सोबत न्यायचे याबाबत विभागीय आयुक्त, पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी संबंधित घटकांना कळवतील. पंढरपुरातील आषाढी एकादशी झाल्यानंतर पौर्णिमेचा काला झाला की सर्व वारकऱ्यांना पुन्हा माघारी आणण्यात येईल. पंढरपुरातील आरोग्य विषयक काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पायी वारीचा आग्रह धरूच नका. एकाला परवानगी दिली तर अन्य लोकांनाही रोखता येणे शक्‍य नाही. त्यामुळे यंदा पायी वारीचा आग्रह कोणीही धरू नये.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आता देवस्थानला वारीतील प्रमुख कमीत कमी लोकांची यादी वारीसाठी तयारी करावी लागणार आहे. पायी वारीबाबत बैठकीत वारकऱ्यांच्या वतीने देवस्थान आणि वारकरी प्रतिनिधींनी आपापली मते मांडली. मात्र, अंतिम निर्णय सरकार देईल तो सर्वांस मान्य राहील, असे सांगण्यात आले होते. 
याबाबत आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड विकास ढगे आणि विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले की, सरकारचा निर्णय मान्य आहे. माऊलींच्या पादुका अष्टमीला (ता.13) देऊळवाड्यातून प्रस्थान झाल्यावर आजोळघरीच राहतील. दशमीच्या दिवशी सरकारच्या सूचनेनुसार पंढरपूरकडे जातील. त्यानंतर एकादशी, द्वादशी, चंद्रभागा स्नान आणि काल्याबाबत तसेच वाखरी ते पंढरपूर परंपरेनुसार पायी जायचे की अन्य मार्गाने याबाबत तत्कालीन निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.  

यंदा घरातूनच करा विठ्ठलाला नमस्कार- 
पायी दिंडीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, दिंडीव्यतिरिक्त पंढरपुरात येणाऱ्या इतर सर्व वारकऱ्यांना सरकारतर्फे सांगण्यात येते की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाण्याचा आग्रह धरू नका. त्याऐवजी पंढरपूरकडे पाहून यंदा घरातूनच पांडुरंगाचे स्मरण करून हात जोडून दर्शन घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या बैठकीत केले. तसेच आषाढी एकादशीच्या आणि द्वादशीचे चंद्रभागा स्नान, वाखरीपासून पंढरपुरात प्रवेश कसा करायचा, परंपरेनुसार काला करून निघायचे की नाही याची भूमिका मात्र तत्कालीन परिस्थितीत संबंधित जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांशी बोलून होणार असल्याने याबाबतचा निर्णय अद्याप गुलदस्त्यातच आहे.