
माळेगाव : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याची पार पडलेली पंचवार्षिक निवडणूक सर्वार्थाने लक्षवेधी ठरली. विरोधक चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी खासगीकरण, कर्जबाजारीपणा, असे विविध मुद्दे सत्ताधाऱ्यांविरुद्ध निवडणुकीत प्रमुख केले होते. त्या तुलनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार शुभारंभ सभेतच, ‘कारखान्याचा अध्यक्ष मीच होणार,’ असे सांगून टाकले व सभासदांना आपलेसे केले. राज्यात उच्चांकी ऊस दर देणार व कारखाना कार्यस्थळाचा कायापालट करणार, असे सांगून त्यांनी निवडणूक लढविली आणि जिंकलीही. त्यामुळे सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पवार पूर्ण करणार का? याची उत्सुकता सभासदांना आहे.