मास्क न वापरल्यानं अजितदादांनी रोहित पवारांना झापलं! म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar_Rohit Pawar

मास्क न वापरल्यानं अजितदादांनी रोहित पवारांना झापलं! म्हणाले...

नवी दिल्ली : अद्यापही कोरोनाचा काळ सरलेला नाही. त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक ठिकाणी कायमच कोरोनाच्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करताना दिसतात. पण आपला पुतण्या आणि आमदार रोहित पवार यांना मास्क न लावल्याबद्दल आपण त्याला कसं झापलं याचा किस्सा त्यांनी बारामतीमध्ये भर सभेत सांगितला. हे उदाहरण देत कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास कठोर भूमिका घेण्याचा इशाराही दिला.

बारामतीमधील धुमाळवाडी येथील एका जाहीर कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, "काल कर्जत-जामखेडला गेलो होतो पण तिथं कोणीच मास्क लावलेलं दिसलं नाही. आमच्या रोहितनंही लावलं नव्हतं. रोहितला म्हटलं, अरे शहाण्या तू आमदार आहेस तू मास्क वापरलास तर मला लोकांना तसं सांगता येईल. मी भाषण करताना तोंडाचा मास्क काढत नाही, अन् लोक मास्क वापरत नाहीत हे बरोबर नाही. तुमच्या निष्काळजीपणामुळं तिसरी लाट आली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, त्यामुळं मला कठोर पाऊल उचलायला लावू नका"

कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेण्याचे आवाहन करताना औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचं उदाहरणंही त्यांनी यावेळी दिलं. पवार म्हणाले, "आता कोरोना गेला असं तुम्हाला वाटतं असेल पण तो परतही येऊ शकतो, ते तुम्हाला समजणारही नाही. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन डोस घेतलेल्या लोकांचीच काम मार्गी लागतील अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळं असा कठोर निर्णय घ्यायला आम्हाला भाग पाडू नका"

loading image
go to top