उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला भाजपचा हिशेब चुकता  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

शहरातील रखडलेल्या बांधकामांचा पुनर्विकास करताना सर्वच ठिकाणांवरील सहा मीटर रुंद रस्त्यांवरही टिडीआर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिला.

पुणे ः शहरातील रखडलेल्या बांधकामांचा पुनर्विकास करताना सर्वच ठिकाणांवरील सहा मीटर रुंद रस्त्यांवरही टिडीआर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिला. तसेच महापालिकेच्या या बाबतच्या ठरावालाही स्थगिती दिली. 323 रस्त्यांएेवजी सर्वच रस्त्यांवर टिडीआर देताना अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावरही कुरघोडी करून हिेशेब चुकता केला.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे महापालिकेत भाजपने बहुमताच्या जोरावर 6 ते 9 मीटर रुंद असलेल्या 323 रस्त्यांवर टिडीआर वापरण्याचा ठराव सुमारे 8 दिवसांपूर्वी मंजूर केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, मनसे यांनी विरोध केल्यावर सर्वच ठिकाणच्या रस्त्यांवर टिडीआर वापरण्यास परवानगी देण्याची उपसूचना त्यावेळी मंजूर करण्यात आली होती. मात्र, त्या उपसूचनेची अंमलबजावणी होईल का, या बाबत साशंकता होती. त्यामुळे नगरसेवकांनी अजित पवार यांना साकडे घातले होते.

त्यानुसार पवार यांनी मुंबईत मंत्रालयात बैठक घेतली. त्यात 6 मीटर आणि त्या पेक्षा रुंद असलेल्या रस्त्यांवर टिडीआर वापरण्यास परवानगी दिली. तसेच फ्रंट मार्जिनमध्ये शिथिलता दिली आणि महापालिकेच्या स्थायी समितीच्या ठरावाला स्थगिती देण्याचा आदेश दिला. संबंधित भूखंड मालकाला त्याचा बांधकाम आराखडा मंजूर करताना दीड मीटर जागा सोडण्याचे बंधन असेल. त्यानंतरचा त्याचा आराखडा मंजूर होईल. भाजपने 6 ते 9 मीटर दरम्यानचे 323 रस्ते निश्चित केले होते. त्यांचे रुंदीकरण करून तेथे टिडीआर देण्याचे ठरविले होते. त्याला पवार यांनी आक्षेप घेतला होता. सगळ्यांनी एकत्र सगळ्याच रस्त्यांवर टिडीआर वापरण्याची परवानगी द्या, अशी सूचना त्यांनी केली होती. परंतु, भाजपने ती सूचना धुडकावून लावल्यावर पवार यांनी आजच्या बैठकीत हिशेब चुकता केला. 

पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला नगरविकात खात्यातील सचिव डॉ. नितीन करीर, महेश पाठक तसेच खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ तसेच अन्य गटनेते उपस्थित होते. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरून बैठकीत भाग घेतला. 

वाहनचालकांनो, तुमच्यासाठी आहे ही महत्त्वाची बातमी

या निर्णयामुळे शहरातील पुनर्विकासाच्या प्रकल्पांना वेग येणार आहे. मात्र, 6 मीटरपेक्षा कमी रुंद रस्त्यावर टिडीआर वापरता येणार नाही. मात्र, आता टिडीआर वापरण्यासाठी मार्केट खुले झाल्यामुळे बांधकाम क्षेत्राला काही प्रमाणात चालना मिळण्याची चिन्हे आहेत. शहरात पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूड- वारजे परिसर तसेच एरंडवणे, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, आदी भागात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar's squabble over BJP