Pune Akashwani : आकाशवाणीवरील बातम्यांचा ‘सुवर्णवारसा’

आकाशवाणी, पुणे केंद्राचा वृत्तविभाग १ मे २०२४ या दिवशी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. ‘प्रसारभारती’ने या केंद्रावरील अन्याय दूर करून ‘प्रादेशिक वृत्तविभाग’ हा अधिकृत दर्जा दिला पाहिजे.
Pune Akashwani
Pune Akashwanisakal

आकाशवाणी, पुणे केंद्राचा वृत्तविभाग १ मे २०२४ या दिवशी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. ‘प्रसारभारती’ने या केंद्रावरील अन्याय दूर करून ‘प्रादेशिक वृत्तविभाग’ हा अधिकृत दर्जा दिला पाहिजे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे सार्थ वर्णन पुणे शहराचे केले जाते. त्यातील अनेक कारणांमध्ये आकाशवाणी, पुणे केंद्र यांच्या कार्यकर्तृत्वाचा मोठा हातभार आहे.

गीतरामायण, बालोद्यान, गृहिणी, आपली आवड, नभोनाट्य यांसारखे स्मरणरंजनाचे कार्यक्रम, तर ‘संस्कृतीच्या पाऊलखुणा’सारखे उत्तम प्रबोधन करणारे कार्यक्रम, ही पुणे केंद्राची ओळख झाली आहे. त्यामुळेच इथले १०-१२ तासांचे प्रक्षेपण मुंबई केंद्राकडे स्थलांतरित झाले, तेव्हा केवळ पुण्याच्याच  नव्हे  तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो श्रोत्यांनी नापसंती दर्शवली होती. या रेट्यामुळे  किमान संध्याकाळचे प्रक्षेपण तरी  नुकतेच पूर्ववत झाले आहे. अजूनही दुपारचे कार्यक्रम हे मुंबई केंद्राच्या अखत्यारीतच आहेत. तेही आता लवकरच पुन्हा पुणे केंद्राकडे यावेत.

पुणे केंद्राची दुसरी महत्त्वाची ओळख म्हणजे सकाळच्या प्रादेशिक बातम्या. महाराष्ट्रातील घराघरातील सकाळ वैविध्यपूर्ण  प्रसंगांनी  नटलेली असली तरी एक मात्र गोष्ट नक्की सामाईक असते आणि ती म्हणजे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या सकाळी ७.१०च्या प्रादेशिक बातम्या. संपूर्ण महाराष्ट्रातच काय; पण जिथे जिथे मराठी माणूस राहतो तिथे तिथे मोठ्या भक्तिभावाने त्या ऐकल्या जातात. याचे मुख्य कारण म्हणजे या बातमीपत्राची विश्वासार्हता आणि आशयसंपन्न उत्तम निर्मिती. पण असे असूनही  प्रादेशिक वृत्तविभाग हा अधिकृत दर्जा आज या विभागाला  नाही.  हा दर्जा जाण्यात ‘प्रसारभारती’ या शीर्षसंस्थेचा  दिशाहीन कारभार कारणीभूत आहे.

२०१६ मध्ये एक फतवा काढून या विभागाचा प्रादेशिक केंद्र हा दर्जा काढून प्रसारभारतीने  या विभागाला पांगळे करण्याचा प्रयत्न केला. याच वृत्तविभागाने कोविडमध्ये तर अनेक निवेदने, मुलाखती या माध्यमांतून जनतेला आश्वस्त करत श्रोत्यांना मानसिक आधार दिला होता. संपूर्ण महाराष्ट्रात या कामगिरीचे कौतुक झालेले आपण पाहिले. पण प्रसारभारतीला याची दखल घ्यावीशी वाटली तर नाहीच; उलट उत्तम उत्पन्न देणारा हा विभाग जून २०२३मध्ये संभाजीनगरला हलवला गेला होता. जनक्षोभामुळे निर्णय मागे घेतला हे खरे; पण ही असुरक्षिततेची टांगती तलवार अजूनही आहे तशी आहेच. सकाळच्या बातमीपत्राबरोबर सकाळी ८.३०चे राष्ट्रीय वार्तापत्र एफ.एम.वरील सकाळी ९.२०  चे बातमीपत्र शिवाय २-२ मिनिटांची तीन बुलेटिन संध्याकाळी सहा वाजता पुणे वृत्तांत, जिल्हा वार्तापत्रे आणि राष्ट्रीय इतर बातमीपत्रांसाठी नियमित योगदान अशी मोठी जबाबदारी पुणे केंद्र समर्थपणे सांभाळत आहे.

पुण्याचे बातमीपत्र सर्वच स्तरातील श्रोत्यांच्या विशेष आवडीचे होण्याचे कारण मला वाटते एकूणच बातमीकडे बघण्याचा या विभागाचा दृष्टिकोन. अत्यंत, वस्तुनिष्ठपणे बातमीचे वजन लक्षात घेऊन, त्यासाठी आवश्यक भाषेचा वापर करून बातमी या संकल्पनेचा डौल सांभाळत त्या प्रसारित होतात. डी. के. अष्टेकर, चंद्रशेखर कारखानीस, श्रीकृष्ण भट, कमलाकर पाठकजी, सुधा नरवणे, शशी पटवर्धन, संज्योत आमोंडीकर, मंगला कारखानीस, भालचंद्र जोशी, नितीन केळकर या मंडळींनी हे बातमीपत्र परिपूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. १ मे १९७५ या दिवशी पहिल्या बातम्या वाचल्या सदाशिव दीक्षित यांनी. बातमी ही केवळ घटनांची वा घडामोडींची जंत्री नसते, तर नागरिकांच्या जगण्याशी तिचा सेंद्रिय संबंध असतो, हे या बातमीपत्रांनी अधोरेखित केले. सर्वदूर अशा पसरलेल्या महाराष्ट्रातील कोट्यवधी श्रोत्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक गरजा लक्षात घेऊन बातम्या निवडल्या. राष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी या पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर घडत असल्यामुळे या बातम्या आपोआपच पुण्याच्या बातमीपत्रात स्थान मिळवतात.

Pune Akashwani
Pune Akashwani : पुणे आकाशवाणीवरील बातमीपत्र सुरुच राहणार! अनुराग ठाकुरांचे नवे आदेश

पुण्याच्या वृत्तविभागाचा देशभर दबदबा आहे. या कामगिरीमुळेच हा विभाग जाहिरातीच्या माध्यमातून देशातला सर्वोत्तम महसूलही मिळवत आहे. हा विभाग चालवताना दरवषी ३० लाख रुपये एवढा खर्च येतो आणि जाहिरातींद्वारे  त्याहून कितीतरी अधिक उत्पन्न या विभागाला मिळते. महाराष्ट्र सरकार आणि अनेक राष्ट्रीयीकृत बँका आपल्या जाहिरातींसाठी सकाळी ७.१०च्या या वार्तापत्राचा प्राधान्याने विचार करतात, यातच या बातम्यांची लोकप्रियता लक्षात येते.

स्वयंपूर्ण विभाग

स्वायत्तता देताना स्वयंपूर्णता हा निकष महत्वाचा मानला जातो. या निकषावर हा विभाग पूर्णपणे  उतरत असूनही ‘प्रादेशिक वृत्तविभाग’ हा अधिकृत दर्जा नसल्यामुळे अनेक अडचणींना  तोंड  देत मार्गक्रमण करत आहे. मुंबई केंद्राकडे वृत्तविभागात संचालक, दोन संपादक, एक पूर्णवेळ बातमीदार, अंशकालीन बातमीदारांचं पॅनल, दोन पूर्णवेळ वृत्तनिवेदक, आणि आता नव्याने निवडलेले तीन कंत्राटी संपादकीय सहाय्यक असा ताफा दिमतीला आहे. पुणे केंद्रात वृत्तविभागात  अतिरिक्त कार्यभार स्वरूपातील एक उप-संचालक, करार पद्धतीने नियुक्त एक वृत्तसंपादक, आणि एक पूर्णवेळ वृत्तनिवेदक असे मनुष्यबळ आहे. भारतीय माहिती सेवेतील कायमस्वरूपी अधिकारी या केंद्रातील वृत्तविभागात तातडीने उपलब्ध व्हायला हवेत. अनेक जबाबदाऱ्या, कामाचा बोजा असलेल्या या विभागाला अशी वागणूक का मिळत आहे, हे समजायला मार्ग नाही.

देशभरात ४७९ एवढ्या संख्येने लहान-मोठी  केंद्रे असलेली आकाशवाणी ९२ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचली आहे. जवळजवळ आपल्या देशातील सर्वच नागरिकांना या कार्यक्रमांचा लाभ घेत येतो एवढे तिचे जाळे मोठे आहे. ‘न्यूज ऑन एआयआर’ हे  अप्रतिम ॲप देशभरातील सर्व महत्त्वाची केंद्रे क्षणार्धात आपल्यासमोर आणते. २३ भाषांमधून  १७९ बोलीभाषांचा वापर आपल्या प्रक्षेपणात करणारी आकाशवाणी ही आज या देशातील बातम्यांचा प्रमुख स्रोत आहे. आकाशवाणीचा हा देदीप्यमान प्रवास हा १९९७ च्या रेडिओ आणि टीव्ही यांना स्वायत्त संस्थेत रूपांतर करण्याच्या निर्णयामुळे खंडित झाला. प्रसारभारतीची निर्मिती माध्यमाच्या सर्जनशीलतेला, सामाजिक-सांस्कृतिक परिघाला सशक्त करण्याच्या प्रयत्नांना खीळ घालणारी ठरली. याचे दुष्परिणाम कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण देशातील आकाशवाणी केंद्रांना भोगावे लागत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी आपली ‘मनकी बात’ सांगण्यासाठी प्राधान्याने  या माध्यमाला निवडले, याचे कारण या आकाशवाणीत ती शक्ती आहे. महात्मा गांधी यांनी तर आपल्या पहिल्या आणि शेवटच्या रेडिओवरील भाषणात या माध्यमाला ‘दैवी आवाज’ म्हटले होते.

रेडिओचा बातमीविभाग हा संपूर्ण केंद्राचा आत्मा असतो. या विभागाच्या कार्यक्षमतेवर केंद्राचे मूल्यमापन होते. मनोरंजन, ज्ञान याचबरोबर अचूक माहिती आणि तीही परिपूर्ण असली की श्रोते समाधानी होतात. होतात. पुण्याचा हा वृत्तविभाग सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना या केंद्रावरील अन्याय दूर करून या विभागाला प्रादेशिक वृत्तविभाग हा अधिकृत दर्जा दिला जावा. संस्थात्मक पातळीवरून दिलेली ही यथोचित अशी शाबासकी ठरेल.

(लेखक ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’त ज्येष्ठ माध्यमअभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com