अक्कलकोट तालुक्यात उसाची वाढ खुंटली; अपेक्षित उत्पादनाच्या केवळ ३० ते ३५ टक्केच उत्पादनाची शक्यता

अक्कलकोट तालुक्यात उसाची वाढ खुंटली; अपेक्षित उत्पादनाच्या केवळ ३० ते ३५ टक्केच उत्पादनाची शक्यता
Published on

JEU26B08302
जेऊर (ता. अक्कलकोट) मोठ्या पावसाअभावी खुंटलेली उसाची वाढ.

अक्कलकोटमध्ये उसाची वाढ ३० टक्क्यांवर
पावसाअभावी पिके खुंटली; आगामी गाळप हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. २५ : मागील वर्षी विक्रमी पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील धरणे, तलाव अन् बंधारे मुबलक भरल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली. मात्र, यंदाच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने उसाची वाढ खुंटली आहे. साधारणपणे या कालावधीत उसाला ३० ते ४० कांड्यांची वाढ अपेक्षित असताना अनेक ठिकाणी केवळ १० ते १५ कांड्यांचीच वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा उसाचे उत्पादन केवळ ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता असून, शेतकरी आर्थिक संकटाच्या छायेत आहेत.

आळगे-हिंगणे, खानापूर अन् हिळ्ळी येथील बंधारे पाण्याने भरलेले असतानाही महाराष्ट्र हद्दीतील शेतकऱ्यांना केवळ दोन तास वीज उपलब्ध झाल्याने या पाण्याचा पुरेसा वापर करता आला नाही. त्यातच पावसाळा सुरू झाल्यानंतर भीमा नदीतील पाणीसाठाही कमी होत गेला. त्यामुळे नदीकाठच्या उसाच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. तालुक्यातील इतर भागांतही दमदार पाऊस न झाल्याने उसाची परिस्थिती चिंताजनक आहे.

पावसाचे पाणी महत्त्वाचे
उसाला केवळ सिंचनाचे पाणी दिल्याने अपेक्षित वाढ होत नाही. पावसाळ्यापूर्वी योग्य मशागत करून जमीन तयार ठेवली अन् पावसाच्या सरी पडल्यानंतर पाणी मुळाशी मुरले, तर उसाची जोमदार वाढ होते. त्यामुळे ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरमध्ये गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस तोडणीसाठी तयार होतो. यंदा मात्र पावसाने साथ न दिल्याने उसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही.

१० ते १५ कांड्यांचीच वाढ
पावसाळ्याचे जवळपास तीन महिने उलटत आले तरी तालुक्यात एकही दमदार पाऊस झालेला नाही. या कालावधीत साधारणपणे उसाला ३० ते ४० कांड्यांची वाढ होते. मात्र, यंदा अनेक ठिकाणी १० ते १५ कांड्यांचीच वाढ झाली आहे. त्यामुळे उसाची अपेक्षित वाढ १०० टक्क्यांच्या तुलनेत केवळ ३० ते ३५ टक्क्यांवर राहिली आहे. पावसाअभावी अन् अपुऱ्या सिंचनामुळे वाढ खुंटल्याने आगामी गाळप हंगामात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी सुरळीत वीजपुरवठा करावा अन् सिंचनाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कोट
-अक्कलकोट तालुक्यात यंदा पावसाळा सुरळीत झाला नाही. विहीर किंवा बोअरचे पाणी कितीही दिले तरी पावसाच्या पाण्यासारखी उसाची वाढ होत नाही. आमच्याकडेही अशीच परिस्थिती असून उसाची वाढ केवळ ३५ टक्के झाली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
- हणमंत चौलगी, शेतकरी, जेऊर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com