

अकोटला कापूस विक्रीत
बनावट दस्तऐवजांचा संशय
‘एसआयटी’च्या तपासणीत कागदपत्रांमध्ये अनियमिततेचा संशय
अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला : जिल्ह्यातील अकोट येथील केंद्रावर २०२४-२५च्या हंगामात भारतीय कापूस निगम (सीसीआय) मार्फत हमीभावाने करण्यात आलेल्या कापूस खरेदीप्रकरणी शासनाच्या विशेष तपासणी पथकाने चौकशी सुरू केली आहे. मागील दोन दिवसांत झालेल्या तपासणीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे संशयास्पद आढळून आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, कापूस खरेदी प्रक्रियेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत आहे.
जिल्ह्यातील कापूस व ज्वारी खरेदीच्या अनुषंगाने यापूर्वी काहींनी शासनाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणी अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर शासनाने विशेष तपासणी पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली होती. या पथकाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सहकार विभागातील दोन अधिकाऱ्यांमार्फत कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
३१ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, २०२४-२५मध्ये सीसीआयमार्फत खरेदी केलेल्या कापसाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे तपासणीसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी अकोट येथील सीसीआय कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना कळविण्यात आले. मात्र संबंधितांनी संपूर्ण कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून न दिल्याने चौकशीच्या कामकाजात अडथळा निर्माण झाल्याची बाब पत्राद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.
दरम्यान, ७ व ८ ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल १३१ देयकांशी संबंधित कागदपत्रे संशयास्पद आढळून आल्याचे सांगितले जात आहे. या देयकांची एकूण किंमत तब्बल ४ कोटी १९ लाख रुपये असल्याने यंत्रणांचेही लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.
अद्याप मोठ्या प्रमाणातील कागदपत्रांची तपासणी होणे बाकी आहे. त्यामुळे पुढील तपासणीत कापूस खरेदी प्रक्रियेतील आणखी गंभीर अनियमितता समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संपूर्ण चौकशीनंतर या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या केंद्रावर विक्री झालेला कापूस शेतकऱ्यांचा होता की व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कापूस विक्री केला, हेही पुढील तपासणीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
१३१ देयकांची कागदपत्रे संशयास्पद
तपासणीचा कालावधी : ७ व ८ ऑगस्ट
संशयास्पद देयके : १३१
देयकांची एकूण किंमत : ४ कोटी १९ लाख रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.