आकुर्डी स्टेशन रस्त्यांचे रुंदीकरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पिंपरी - आकुर्डी रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या चार रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरासह प्राधिकरण, रावेत, बिजलीनगर व वाल्हेकरवाडी परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे.

पिंपरी - आकुर्डी रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या चार रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरासह प्राधिकरण, रावेत, बिजलीनगर व वाल्हेकरवाडी परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे.

निगडी, आकुर्डी, त्रिवेणीनगर, रुपीनगर, प्राधिकरणातील सेक्‍टर २२ ते २६, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रावेत, पुनावळे, किवळे आदी भागातील नागरिकांच्या सोयीसाठी आकुर्डी रेल्वे स्टेशन मध्यवर्ती ठरले आहे. शिवाय स्टेशन परिसरात डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. अरविंद तेलंग कॉलेज, म्हाळसाकांत महाविद्यालय, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांसह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालय, नवनगर विकास प्राधिकरण कार्यालय, पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) विभागीय कार्यालय, विक्री व सेवाकर भवनही आकुर्डी स्टेशनच्या परिसरात आहे. त्यामुळे नोकरदार व विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांची येण्या-जाण्याची सोय झाली आहे. शिवाय दुचाकींसह मोटारी व बससारख्या अवजड वाहनांचीही रहदारी या परिसरात वाढलेली आहे. वाढती रहिदारी विचारात घेऊन आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते रुंद करण्याची आवश्‍यकता आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. त्याला स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यास आकुर्डी स्टेशन परिसरातील रस्ते प्रशस्त व दुहेरी होणार असून, रहदारीच्या समस्येपासून नागरिकांची सुटका होणार आहे.

सद्यःस्थितीत रस्ते
सद्यःस्थितीत आकुर्डी रेल्वे स्टेशन ते बास्केटपूल रस्ता दुहेरी आहे. मात्र, शैक्षणिक संस्था व रावेत, पुनावळे परिसराचा झालेला विकास लक्षात घेऊन सदर रस्ता आणखी रुंद करण्याची गरज आहे; तसेच बिजलीनगर, गुरुद्वारा रस्ता, गंगानगर, अभियांत्रिक महाविद्यालयास अन्य रस्तेही रुंदीकरणाची गरज आहे.  

मी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाला आहे. दापोडीपासून आकुर्डीपर्यंत लोकलने येतो. रेल्वे स्टेशनपासून कॉलेजपर्यंत चालत जावे लागते. मात्र, रस्ता अरुंद असल्यामुळे लोकल आल्यानंतर रिक्षा व मोटारसायकलींमुळे चालणे मुश्‍कील होते. रस्ता रुंद झाल्यास प्रवाशांसह विद्यार्थ्यांची सोय होईल.  
- सुशांत माने, विद्यार्थी, सांगवी

मला दररोज पुण्यात नोकरीला जावे लागते. रावेत येथून मोटारसायकलने येतो. रेल्वे स्टेशनजवळ मोटारसायकल लावून शिवाजीनगरला लोकलने जातो. ड्यूटीवरून आल्यानंतर घरी जाताना लोकलमधून उतरलेल्या प्रवाशांची रस्त्यावर खूप गर्दी असते. त्यातून मार्ग काढताना मोटारसायकल सांभाळून चालवावी लागते. 
- महेश पाटील, नोकरदार, रावेत

Web Title: Akurdi Station Road Development