मेट्रोसाठी फ्रान्सचे ‘सिग्नल’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मार्च 2019

जागतिक स्तरावरील पाच कंपन्यांशी स्पर्धा करीत ‘अलस्टॉम’ला सुमारे २४० कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांत डिसेंबरमध्ये मेट्रोची चाचणी होण्यासाठीच्या प्रक्रियेला आता वेग येणार असून, कंपनीकडून अल्पावधीतच काम सुरू होईल.

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील पिंपरी -स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मेट्रो मार्गासाठी सिग्नलिंग आणि कम्युनिकेशन सिस्टिम फ्रान्समधील ‘अलस्टॉम’ कंपनी करणार आहे. जागतिक स्तरावरील पाच कंपन्यांशी स्पर्धा करीत ‘अलस्टॉम’ला सुमारे २४० कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांत डिसेंबरमध्ये मेट्रोची चाचणी होण्यासाठीच्या प्रक्रियेला आता वेग येणार असून, कंपनीकडून अल्पावधीतच काम सुरू होईल.

शहरात सुमारे १५ आणि पिंपरी- चिंचवडमध्ये सुमारे १६ किलोमीटर एलिव्हेटेड मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. कृषी महाविद्यालय ते स्वारगेटदरम्यान सुमारे पाच किलोमीटरदरम्यान मेट्रोचा मार्ग भुयारी असेल. दोन्ही शहरांत मेट्रो मार्गांची डिसेंबरमध्ये चाचणी घेण्यात येणार आहे. मेट्रो मार्गासाठी सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल टेक्‍नॉलॉजी, टेलिकम्युनिकेशन, नियंत्रण कक्ष उभारणे, प्रवासी माहिती डिस्प्ले, सीसीटीव्ही आणि ॲक्‍सेस कंट्रोल सिस्टिम, सार्वजनिक तक्रार प्रणाली उभारणे आदी विविध प्रकारची कामे ‘अलस्टॉम’ करणार आहे. या कंपनीला मुंबई तीन मेट्रो मार्गांचेही सुमारे ४६० कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. पुण्यातील मेट्रो मार्गांवरील एकूण ३१ गाड्यांसाठी दळणवळण यंत्रणा ‘अलस्टॉम’ निर्माण करणार असून, त्या बाबतची देखभाल दुरुस्तीही त्यांच्याकडून होणार आहे. या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. पुणे आणि मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठीही कंपनी प्रयत्नशील आहे. 

कंपनीचे भारत आणि दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक ॲलेन स्पोर म्हणाले, ‘‘मेट्रोच्या प्रतिष्ठेच्या प्रकल्पासाठी आमची निवड केली याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांतील नागरिकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यासाठी आमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत मिळेल आणि या शहरांच्या एकंदर विकासातही आम्ही योगदान देऊ. या भागात शाश्वत वाहतूक वाढवण्यासाठी या प्रकल्पांची मोलाची मदत होणार आहे.’’ 

पहिल्या टप्यातील बव्हंशी काम पूर्ण 
पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये डिसेंबरमध्ये मेट्रोची चाचणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ५ आणि ६ किलोमीटरवर मेट्रो धावणार आहे. त्यासाठी खांब उभारून त्यावर स्पॅन टाकण्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. आता त्यावर लोहमार्ग उभारून ‘सिग्नलिंग’ची यंत्रणा निर्माण करण्याचे काम सुरू होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Alastrom company in France will be working for the metro route