बारामतीत अवैध धंद्यांवर पोलिसांकडून धडक कारवाया; दारू, गांजा केला जप्त

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

किराणा मालाच्या दुकानात बिगर परवाना देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यास आज पोलिसांनी अटक केली.

बारामती (पुणे) : किराणा मालाच्या दुकानात बिगर परवाना देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यास आज पोलिसांनी अटक केली. तांदुळवाडी येथील निर्मळ वस्तीवरील सतीश विष्णू लोंढे हा त्यांच्या स्वामी समर्थ किराणा दुकानामध्ये बेकायदा दारू विकत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक संदीप गोसावी, पोलिस कर्मचारी सुरेश भोई, तानाजी गावडे, रमेश केकाण, अप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहुल लाळगे, शरद गावडे, श्रीकांत गोसावी, लता हिंगणे, जयश्री गवळी यांनी कारवाई करीत या दुकानातून 50 हजारांची दारू जप्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
दरम्यान, बारामती शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक लाख 38 हजार रुपये किंमतीचा पाच किलो गांजा पकडला. बारामती शहर पोलिसांनी दौंड तालुक्यातील राहू येथील जय तुळजाभवानी हॉटेलच्या पाठीमागील तंदूरभट्टीत ठेवलेला पाच किलो 180 ग्रॅम वजनाचा एक लाख 38 हजार रुपये किमतीचा गांजा पकडला. याप्रकरणी अनिल पंढरीनाथ सायकर (रा. राहू, ता. दौंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

दूध दराबाबत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे बारामतीत आंदोलन

बारामती शहरातील आमराई भागातील एका छाप्यात पोलिसांनी गांजा पकडला होता. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सेवक प्रकाश सकट हा फरार होता. त्याला 17 रोजी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने हा गांजा अनिल पंढरीनाथ सायकर (रा. राहू, ता. दौंड) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहाय्यक उपनिरीक्षक संदीपान माळी, ओंकार सिताप, पोपट नाळे, राजेश गायकवाड, सिद्धेश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, अकबर शेख, उमेश गायकवाड, महिला पोलिस कांबळे आदींनी तेथे पंचांसमक्ष छापा टाकला. 

दरम्यान शहर पोलिसांनी गांजा व्यवसायाचे रॅकेट उद्धवस्त करण्याचा चंग बांधला आहे. गेल्या पंधरा दिवसात तीन धडक कारवाया करत आजवर सुमारे तीन लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alcohol seized by police in baramati