दूध दराबाबत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे बारामतीत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये प्रतिलिटर अनुदान व दूध पावडरला प्रतिकिलो पन्नास रुपये अनुदानाच्या मागणीबाबत आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

बारामती (पुणे) : गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये प्रतिलिटर अनुदान व दूध पावडरला प्रतिकिलो पन्नास रुपये अनुदानाच्या मागणीबाबत आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. तसेच, वादळ, अतिवृष्टी, दुबार पेरणी, खताचा तुटवडा यामुळे दूध उत्पादकांची अवस्था दयनीय झाली आहे. 

धक्कादायक : 'ती' कोरोना पॉझिटिव्ह, तरी दुबईला गेली कशी?

राज्यात 150 लाख लिटर गायीच्या दुधाचे उत्पादन होते. त्यापैकी 30 लाख लिटर दूध सहकारी संघाकडून खरेदी केले जाते. 90 लाख लिटर दूध खासगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. 30 लाख लिटर दूध शेतकरी स्वतः हॉटेल व ग्राहक यांना पुरवतो. शासकीय योजनेद्वारे फक्त एक लाख लिटर दुधाची खरेदी केली जाते. लॉकडाउनच्या काळात दुधाच्या विक्रीत 30 टक्क्यांची घट झाली आहे. विविध कारणांनी दुधाची मागणीही घटली आहे. खासगी व सहकारी दूध संघाकडून 20 ते 22 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केल्या जात आहे. शासनाने दहा लाख लिटर दूध 25 रुपये प्रतिलिटर या भावाने खरेदीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात सात लाख लिटर दुधाची खरेदी केली जात आहे. 

कौतुकाचा वर्षाव : 72 व्या वर्षी, मिळवलं लॉ विषयात गोल्ड मेडल

शासनाकडून दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान व दूध भुकटीसाठी प्रतिकिलो पन्नास रुपये अनुदान तसेच, शासनाकडून 30 रुपये लिटर दराने दूध खरेदी या मागणीसाठी एक ऑगस्टपासून दुध संकलन बंदचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. याप्रसंगी संदीप चोपडे, अँड. अमोल सातकर यांच्यासह भाजपच्या वतीने पांडुरंग कचरे, सतीश फाळके, सुधाकर पांढरे, गोविंद देवकाते आदी उपस्थित होते. या निवेदनावर माणिकराव दांगडे, अॅड. अमोल सातकर, संदीप चोपडे, विठ्ठलराव देवकाते, महादेव कोकरे, काका बुरुंगले, लखन कोळेकर, डॉ. नवनाथ मलगुंडे, किशोर सातकर, चंद्रकांत वाघमोडे, शैलेश थोरात, तुषार गरदडे आदींच्या सह्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, जमावबंदीचा आदेश भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अॅड. अमोल सातकर, पांडुरंग कचरे, सतीश फाळके, सुधाकर पांढरे, गोविंद देवकाते यांच्यासह इतर अनोळखी पाच ते सहा जणांविरुध्द शहर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी पांडुरंग गोरवे यांनी फिर्याद दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rashtriya samaj party agitates in baramati about milk price