esakal | लोणावळा धरणाची पातळी वाढली; इंद्रायणी काठच्या गावांना अलर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

भुशी धरण

लोणावळा धरणाची पातळी वाढली; इंद्रायणी काठच्या गावांना अलर्ट

sakal_logo
By
पिंताबर लोहार

पिंपरी : लोणावळा धरणाची पातळी बुधवारी सायंकाळी पाच वाजता ६२३.८८ मीटर होती. पाणीसाठा ८.८५८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५८.७४ टक्के होता. धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्याचा कल गेल्या दोन दिवसांपासून जास्त असून काल अवघ्या आठ तासांत लोणावळा धरणावर ११४ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

लोणावळा धरणाचा सांडवा द्वारविरहित अनियंत्रित स्वरूपाचा असून पुढील २-३ दिवस अतिवृष्टी पर्जन्याचा कल हवामान विभागाने वर्तविलेला आहे. टाटा कंपनीकडून महत्तम क्षमतेने म्हणजेच ८००-८५० क्यूसेस पाणी वीजनिर्मितीकरिता खोपोली वीजगृहात वळविण्यात येत आहे.

हेही वाचा: चाकांविना ६०० किमी वेगाने धावली ‘तरंगती’ रेल्वे

धरणातील सद्यस्थितीतील सरासरी आवक १६००-१७०० क्यूसेस दराने येत आहे. त्यामुळे धरण जलाशय पातळीमध्ये वाढ होत असून साधारण कल असाच राहिल्यास लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता आहे आणि द्वारविरहित सांडव्यावरून अनियंत्रित विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या खालील बाजूस असलेली शेती पम्प, अवजारे, जनावरे, इतर तत्सम साहित्य वेळीच काढून घ्यावीत. इंद्रायणी नदीपात्रामध्ये उतरणे धोक्याचे आहे, असे धरण प्रमुख-टाटा पॉवर बसवराज मुन्नोळी यांनी कळविले आहे.

लोणावळा-खंडाळ्यात १४० मिलिमीटर पाऊस

लोणावळा : दोन आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून, लोणावळेकरांना पावसाने झोडपले असून, बुधवारी (ता. २१) सायंकाळी पाचपर्यंत दिवसभरात १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोणावळा परिसरात हंगामात आतापर्यंत एकूण दोन हजार ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी आठपर्यंत ८१ मिलिमीटर पाऊस नोंदला. गेले दोन दिवस पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गावर काही ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. लोणावळा नगरपालिकेचे तुंगार्ली, लोणावळा तलाव, टाटांच्या वळवण धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

loading image