पुण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांची वज्रमूठ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

आमदार म्हणतात... ‘दिशा उद्याची’ उपयुक्त 
शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रमुख ४७ प्रश्‍नांचे संकलन ‘सकाळ’ने ‘दिशा उद्याची...’ या पुस्तिकेत केले. प्रश्‍नाची सद्यःस्थिती आणि ते सोडविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजना, यांचाही त्यात समावेश आहे. ही पुस्तिका सर्व आमदारांना देण्यात आली. शहराचे प्रश्‍न अधिवेशनात मांडताना ही पुस्तिका उपयुक्त ठरेल, अशीही प्रतिक्रिया अनेक आमदारांनी व्यक्त केली.

पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी, पाण्याच्या वाटपाचे नियोजन, झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए), मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, इमारतींचा पुनर्विकास, हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीओर) वाटपाचे नियोजन, जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) क्षेत्रावरील अतिक्रमणे, आदी विषयांशी संबंधित मुद्दे विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात उपस्थित करून त्यांची तड लावणार असल्याचा निर्धार सर्वपक्षीय आमदारांनी ‘सकाळ’च्या बैठकीत शनिवारी केला. केवळ पाठपुरावा करणार नसून, अंमलबजावणीसाठीही आग्रह धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधिमंडळाचे अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अधिवेशनात पुण्यातील कोणते प्रश्‍न मांडले जाणार, कोणत्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार आग्रह धरणार, त्यासाठीचा कृतीकार्यक्रम कसा असेल, याबाबत नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी ‘सकाळ’ने आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यात सर्वपक्षीय आमदारांनी भाग घेतला.

आणखी वाचा - पुण्यातील चुकलेल्या उड्डाण पुलांचं करायचं काय?

शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रश्‍न अधिवेशनात मांडण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्यावरही बैठकीत एकमत झाले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे; तसेच माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, लक्ष्मण जगताप, राहुल कुल, अशोक पवार, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, संजय जगताप, अतुल बेनके, अनंत गाडगीळ यांनी भाग घेतला. बैठक आयोजित करण्याचा उद्देश ‘सकाळ’चे संचालक संपादक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केला; तर संपादक सम्राट फडणीस यांनी स्वागत केले. कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, निवासी संपादक रमेश डोईफोडे या प्रसंगी उपस्थित होते. 

अजित पवार अनुपस्थित
राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ऐनवेळी बैठकीला दांडी मारली. पवार यांच्या शासकीय दौऱ्यात आमदारांच्या बैठकीचा समावेश होता. पुणे, पिंपरी- चिंचवड आणि जिल्ह्यातील मतदारांच्या बहुतांश सार्वजनिक प्रश्नांचा थेट संबंध पवार यांच्या अर्थखात्याशी आहे. मात्र, या बैठकीला अनुपस्थित राहणे त्यांनी पसंत केले. आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पवार यांच्या वतीने आमदारांच्या बैठकीचा तपशील नोंदवून घेतला. तुपे म्हणाले, ‘‘अजित पवार यांनी बैठकीतील चर्चेचा तपशील मागितला असून, त्यावर पालकमंत्री म्हणून ते काही चांगले निर्णय घेतील.’

केवळ तीन मिनिटांमुळे अधिवेशनाची झलक
बैठकीला सुरुवात होताच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीचा ताबा घेतला आणि पहिल्यांदा नव्या आमदारांना बोलण्याची संधी दिली. मात्र, प्रत्येकाने तीन मिनिटांत मुद्दे मांडण्याचा दंडक डॉ. गोऱ्हे यांनी घालून दिला. काही आमदारांनी तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वेळ संपल्याचे सांगत गोऱ्हे यांनी आटोपते घेण्याची सूचना आमदारांना केली. तर, ज्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत आपले मुद्दे मांडले त्यांचे कौतुकही गोऱ्हे यांनी केली. शेवटी आपली भूमिका मांडून गोऱ्हे यांनी बैठकीची सांगता केली. त्यामुळे अगदी विधिमंडळासारखेच कामकाज आणि शिस्त लावल्याने ‘सकाळ’ने बोलविलेली बैठक म्हणजे, अर्थसंकल्पीय अधिवेशनाची झलक ठरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all party MLA meeting to solve Pune question