येथे सर्व कामे विनामूल्य होतात...पोलिस ठाण्यातील पाटी चर्चेचा विषय

मिलिंद संगई 
Thursday, 26 November 2020

नूतन पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर पोलिस ठाण्याचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुखी व्हावी या दृष्टीकोनातून बरेचसे बदल केले. पोलिस ठाण्यात येणा-या नागरिकांना विश्वासाचे वातावरण मिळावे व पोलिस आपल्या मदतीसाठी आहेत, ही भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी या उद्देशाने शिंदे यांनी आपल्या केबिनमध्ये अशी पाटीच लावली आहे.

बारामती : लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा आहे, पोलिस स्टेशन येथे सर्व कामे विनामूल्य केली जातात, काही तक्रार असल्यास संपर्क साधा. ही पाटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कार्यालयातील नसून तर ती बारामती शहर पोलिस ठाण्यात लावली आहे. ही पाटी हा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. 
 
नूतन पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर पोलिस ठाण्याचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुखी व्हावी या दृष्टीकोनातून बरेचसे बदल केले. पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना विश्वासाचे वातावरण मिळावे व पोलिस आपल्या मदतीसाठी आहेत, ही भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी या उद्देशाने शिंदे यांनी आपल्या केबिनमध्ये अशी पाटीच लावली आहे. 

 '...म्हणून आत्महत्या नाही करू शकलो'; गौतम पाषाणकरांनी सांगितली 'मन की बात'!​

इतर पोलिस ठाण्यांमधील पोलिसांच्या सुरस कहाण्या कानावर असताना बारामतीत मात्र आता पोलिस ठाण्यातील कामे विनामूल्य होतात, हा संदेश थेटपणे लोकांपर्यंत देत पोलिस निरिक्षकांनी एक प्रकारे आपल्या समवेत काम करणाऱ्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही हा संदेशच दिल्याचे मानले जात आहे. 

पोलिस ठाण्यात दलाली करणाऱ्यांनाही हा संदेश जावा अशी पोलिस निरिक्षकांची अपेक्षा असून भयमुक्त वातावरण या शहरात निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बारामतीत सावकारीच्या विरोधात त्यांनी उघडलेल्या मोहिमेला यश येत असून अनेक सावकारांनी आता आपली भूमिकाच बदलली आहे. दुसरीकडे ज्याची ओळख नाही, अशा माणसाचेही काम पोलिस ठाण्यात व्हायला हवे ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

Corona Updates: ३५ दिवसांनंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा रुग्णांचा आकडा हजारापार!

पैशांची मागणी केल्यास तक्रार करा....!
नागरिकांना पोलिस मित्र वाटावा, पोलिसांची अडचणीच्या काळात हक्काने मदत घ्यावी व कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांना नागरिकांनी मदतही करावी, असाच हेतू आहे. कोणत्याही नागरिकाकडून कोणत्याही पोलिसाने पैशांची मागणी केल्यास थेट तक्रार करावी.
- नामदेव शिंदे, पोलिस निरिक्षक, बारामती. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All the problems here Police location is a topic of discussion