esakal | सीरमकडून लस खरेदीसाठी परवानगी द्या; पुणे महापालिकेची केंद्राकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

सीरमकडून लस खरेदीसाठी परवानगी द्या; पुणे महापालिकेची केंद्राकडे मागणी

सीरमकडून लस खरेदीसाठी परवानगी द्या; पुणे महापालिकेची केंद्राकडे मागणी

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : कोरोनावरील लशीचे २५ लाख डोस ‘सीरम इन्स्टिट्यूट’कडून थेट खरेदी करण्यासाठी पुणे महापालिकेने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. सध्या केंद्र व राज्य सरकार आणि रुग्णालयांना लस उत्पादक कंपनीकडून थेट खरेदीची मुभा आहे. त्यामध्ये पुणे शहरालाही विशेष बाब म्हणून लस खरेदीची परवानगी देण्याची मागणी केली असून, सीरमतर्फेही या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: विक्रमी धान्योत्पादन! देशावर संकट तरी शेतकरी मागे हटला नाही

आर्थिक बाबींना चालना तसेच शहरातील लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर' (एमसीसीआयए) आणि 'पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड-19 रिस्पॉन्स' (पीपीसीआर) ने पुढाकार घेत मंगळवारी महापालिका पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापौरांसह आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष आणि ‘पीपीसीआर’चे मुख्य समन्वयक सुधीर मेहता, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, पुणे सिटी कनेक्टचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी रुची माथूर, ‘एमसीसीआयए’चे माजी अध्यक्ष मुकेश मल्होत्रा आदी उपस्थित होते. त्यावेळी महापौर यांनी ही माहिती दिली.

शहराचा पॉझिटिव्हिटी दर सध्या 6 ते 7 टक्के असून, रिकव्हरी दर 96 टक्के झाला आहे. रुग्णालयातील आयसीयू खाटा, व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवावी लागणार असून, खाटांच्या उपलब्धतेची तत्काळ माहिती देण्यासाठी डॅशबोर्डमध्ये सुधारणेची गरज आहे, तसेच मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बसवावा लागेल, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा: रुग्णालयाकडून भरमसाठ बील; 'त्यांनी' काढले चक्क अंगावरचे कपडे

उपस्थितांनी केलेल्या सूचना :

- पॉझिटिव्हिटी दर कमी असलेल्या परिसरात

निर्बंध शिथिल करावेत

- लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना संचारास मुभा असावी

- दर आठवड्याला निर्बंधांबाबतचा आढावा घ्या

- लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया सुलभ करा

- लस घेतलेल्या तरुणांना कामावर जाण्याची परवानगी द्यावी

- निर्बंधांमुळे आर्थिक क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला असून, ते काही प्रमाणात सैल करण्याची गरज आहे.

- मुलांवरील उपचारांसाठी ‘इम्युनोग्लोबिन’ औषध पालिकेने उपलब्ध करून द्यावे

बैठकीतील सूचना संकलित करून, पालकमंत्र्यांसोबतच्या आढावा बैठकीत चर्चा करू निर्बध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील. मात्र, राजकीय व सामाजिक कार्यक्रम, तसेच लग्नासारख्या कार्यक्रमांवर बंधने कायम ठेवण्याचा पालिकेचा विचार आहे. अत्यावश्यक सेवा क्षेत्र शनिवार-रविवारी सुरू ठेवण्यास कदाचित परवानगी दिली जाईल.

- मुरलीधर मोहोळ, महापौर