काय सांगता? पुणे विद्यापीठ चौकात रस्ता ओलांडायला लागतायेत 15-20 मिनिटे!

Almost 15-20 minutes need to cross the road at Pune University Chow
Almost 15-20 minutes need to cross the road at Pune University Chow

पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाण पूल पाडल्यानंतर पायाभूत सुविधांचे काम अद्याप पूर्ण न झालेले नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे धोकादायक झाले आहे. या बाबत महापालिका, पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए), वाहतूक पोलिस परस्परांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. 

मेट्रो प्रकल्पासाठी विद्यापीठ चौकातील जुना उड्डाण पूल ऑगस्ट महिन्यात पाडण्यात आला. त्यानंतर चौकातील सर्व वाहतूक नियंत्रक दिवेही काढण्यात आले आहेत. औंधकडून विद्यापीठ चौकमार्गे शिवाजीनगरकडे जाणारा रस्ता आणि गणेशखिंड रस्त्यावरून बाणेर, पाषाण आणि औंधला जाणाऱ्या रस्त्यावरही वाहनांची प्रचंड वाहतूक असते. महापालिकेने विद्यापीठ चौकात वाहतूक नियंत्रक दिवा नुकताच बसविला. मात्र, चौकातून वाहनांचा वेग भरधाव असतो. तसेच हा रस्ता रुंद असल्यामुळे पादचाऱ्यांना तो सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती यांनाही हा रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले आहे. पादचाऱ्यांना हा चौक ओलांडण्यासाठी किमान 15-20 मिनिटे लागतात, असे निरीक्षण "परिसर'च्या "स्टेप टोवर्डस एम्पॉंवरींग पेडिस्ट्रियन' (स्टेप) या अभ्यासगटाने नोंदविले. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर झेब्रॉ क्रॉसिंग आहे. परंतु, तेथे वाहतूक नियंत्रक दिवे, गतिरोधक नसल्यामुळे वाहने थांबत नाहीत. तसेच जुना उड्डाण पूल पाडण्यात आल्यावर त्याचा राडरोडा, वायरी या पदपथावर पडल्या आहेत. तसेच मेट्रोच्या कामासाठी पदपथावरच कोठी बांधण्यात आली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच जा- ये करावी लागते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी "स्टेप'च्या प्रतिनिधींनी पीएमआरडीए, महापालिका आणि वाहतूक पोलिसांशी भेट घेतली. त्यावेळी तिन्ही यंत्रणांनी परस्परांवर जबाबदारी ढकलली. पादचाऱ्यांसाठी विशिष्ट रुंदीचा रस्ता विना अडथळा उपलब्ध व्हावा आणि पदपथ पादचाऱ्यांसाठी उपलब्ध व्हावेत, यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे शहराच्या पादचारी सुरक्षा आणि सुविधा धोरणात नमूद करण्यात आले आहे. 

या बाबत वाहतूक शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक रमेश मोरे म्हणाले, ""विद्यापीठ चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आल्यामुळे पोलिसांवरील नियमनाचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत तेथे पोलिस रस्त्यावर उभे राहून नियमन करतात. गतिरोधक, वाहतूक चिन्हांची माहिती देणारे फलक उभारण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधण्यात आला आहे. पुढच्या काळात वाहतुकीत वाढ झाल्यावर चौकातील वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करेल.'' 
"स्टेप'च्या प्रिया फरांदे म्हणाल्या, ""विद्यापीठ चौकात पाच रस्ते एकत्र येतात. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सातत्याने संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करीत आहोत. या चौकात पुरेशा संख्येने वाहतूक नियंत्रक दिवे, ट्रॅफिक आयलंड, गतिरोधक निर्माण करणे आवश्‍यक आहे. अन्यथा पादचाऱ्यांवर असुरक्षिततेतीच टांगती तलवार कायम राहिल.'' 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात या हव्यात उपाययोजना 
- चौकात पुरेशा संख्येने वाहतूक नियंत्रक दिवे बसवावेत 
- वाहतूक नियंत्रक दिव्यांत पादचाऱ्यांसाठी वेळ हवा 
- झेब्रॉ क्रॉसिंग, गतीरोधक पुरेशा संख्येने हवेत 
- पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करावेत 
- भरधाव वाहनांवर कारवाई हवी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com