पुण्यातील कापड बाजार येतोय रुळावर; व्यावसायिक काय म्हणताहेत पाहा

Pune_Textile_Market
Pune_Textile_Market

पुणे : ऐन लग्नसराईत आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे शहरातील कापड व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला होता. मात्र लॉकडाऊनमध्ये दिलेल्या काही सवलतीमुळे कापड बाजाराला पुन्हा झळाळी आली असून सुमारे 50 टक्क्यांपर्यंत व्यवहार सुरळीत झाले आहेत. शहरातील बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असून जवळपास सर्व दुकाने देखील पुन्हा उघडली आहेत.

लॉकडाउनमध्ये रविवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता या शहरातील दोन्ही मुख्य बाजारपेठा या काळात पूर्णतः बंद होत्या. त्यामुळे तेथील कोट्यावधी रुपयांची उलाढाल थांबली होती. मात्र गेल्या काही दिवसांत स्थिती बदलली असून आता आशादायक चित्र दिसत आहे. लग्न किंवा इतर आवश्यक बाबींसाठी नागरिक घराबाहेर पडून आता कपडे खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनीमधील उत्साह वाढला आहे. व्यवहारा दरम्यान सामाजिक अंतर आणि सुरक्षाविषयक सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक भीती न बाळगता आता पुन्हा खरेदी करू लागले आहेत.

रविवार पेठ येथील होलसेल बाजार आणि लक्ष्मी रस्त्यासह शहरातील अनेक छोट्या-मोठ्या कपड्याच्या बाजारपेठा आता गजबजू लागल्या आहेत. याबाबत रविवार पेठ कपडा बाजार संघटनेचे अध्यक्ष उमेश झंवर यांनी सांगितले की, आता पूर्वीपेक्षा आशादायी चित्र दिसू लागले आहेत. नागरिक खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असून पूर्वीच्या तुलनेत जवळपास 50 टक्के व्यवहार सुरू झाला आहे. पी1 व पी2 पद्धतीने सर्व दुकाने देखील खुली झाली आहेत.

कापड मार्केटमधून दरवर्षी शहरात सुमारे एक हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. शहरात छोटी-मोठी कपड्यांची 10 हजार दुकाने आहेत. तर जवळपास एक लाख कामगार या व्यवसायावर अवलंबून आहेत. या सर्वांच्या दैनंदिन व्यवहाराला आता चालना मिळाली आहे. येत्या पंधरा दिवसात कोरोनाच्या आधिसारखी स्थिती निर्माण होऊन शंभर टक्के खरेदी विक्री सुरू होईल. व्यवसाय करीत असताना सुरक्षा विषयक सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. 

लग्नघरातील खरेदी वाढली :  
एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने व्यवसायावर मोठा परिणाम झाला. आता मात्र लग्नाची खरेदी वाढली आहे, पण आहेरासाठी लागणाऱ्या कपड्यांची खरेदी होत नाही. त्यामुळे लग्नाचा खर्च कमी झाल्याने नवरदेव, नवरी आणि कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या कपड्यांवर पूर्वी पेक्षा जास्त खर्च करत असल्याचे दिसून आले आहे, असे झंवर यांनी सांगितले.

मार्च, एप्रिल आणि मेमध्ये लांबलेली अनेक लग्ने जूनमध्ये पार पडली. तसेच त्या तीन महिन्यात कपड्याची दुकाने पूर्ण बंद असल्याने दैनंदिन वापरातील कपडे देखील खरेदी करता आले नाही. त्यामुळे जूनमध्ये या दोन्ही वर्गाकडून चांगल्या प्रमाणात कपड्यांची खरेदी झाली. मात्र आता पाऊस सुरू झाला आहे. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लग्ने देखील खूप कमी प्रमाणात होतात. त्यामुळे त्या वेळची स्थिती कशी असेल हे आता सांगता येत नाही. या महिन्यात सेल देखील सुरू होतील त्यामुळे चांगल्या प्रमाणात व्यवसाय होण्याची आशा आहे.
- दिनेश जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जय हिंद ग्रुप

कोरोनापासून बचाव होण्यासाठी आवश्यक ती काळजी घेऊ शकतो मात्र थांबू शकत नाही, हे आता नागरिकांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे लोक आता बाहेर पडत असून दुकानात येऊन खरेदी करत आहेत. आम्ही देखील सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेत आहोत. लक्ष्मी रस्त्यासारख्या ठिकाणी सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी मिळायला हवी. कारण खरेदीसाठी पर्याय मिळाले तर एकाच दुकानात गर्दी होणार नाही. कार्यालये सुरू झाल्याने आता लग्नाला व्यतिरिक्त इतर कपड्यांची खरेदी देखील वाढली आहे.
- कौशिक मराठे, संचालक, कॉटनकिंग

लॉकडाउन काळात अडकलेले लग्न सध्या करून घेतली आहे. 20 टक्केच ग्राहक असल्याने सामाजिक अंतर पाळले जात आहे. या सर्वात लग्नाच्या कपड्यांची मागणी सर्वाधिक आहे. शासनाकडून चांगला सहकार्य मिळत आहे. पी1 पी2 मुळे ग्राहक विखुरले आहेत. त्यामुळे दररोज पूर्व वेळ सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी. तसेच राज्याबाहेरची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होणे गरजेचे आहे. आर्थिक चक्र फिरले पाहिजे. 
- सागर गुजर, संचालक, सिलाई 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या केवळ 10 ते 15 टक्के व्यवसाय सुरू आहे. पुढील तीन महिने स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. नागरिक केवळ लग्नाची व इतर गरजेच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. 
- अमोल येमुल, संचालक, पेशवाई ग्रुप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमच्याकडे खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्यांना आम्ही ठराविक वेळ देतो. त्यामुळे खरेदीदार दुकानात आल्यानंतर सामाजिक अंतर पाळले जाते. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार आम्ही सगळी काटेकोरपणे काळजी घेत आहोत. त्यामुळे लोकांनी न घाबरता खरेदीसाठी बाहेर पडावे. कपडे खरेदी करण्यासाठी हीच चांगली वेळ आहे. कारण सध्या कपड्यांवर चांगली सवलत देखील देण्यात येत आहे. लस आल्यानंतर सर्व परिस्थिती आणखी चांगल्या पद्धतीने सुधारू शकते.

- राजेश शेवानी, संचालक, रंगोली 

कोरोनाची भीती असली तरी सध्या नागरिक  सर्व ती काळजी घेऊन खरेदीसाठी येत आहेत. आम्ही देखील काजळी घेत आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता खरेदीला यावे. अगदीच काही असेल तर वेळ घेऊन देखील येऊ शकता. सध्या 25 टक्के व्यवसाय होत आहे. पी 1 पी 2 बाबत थोडा गोंधळ आहे. त्यामुळे त्यात सुसूत्रता येणं गरजेचे आहे. 
- संजय शेवणी, भागीदार, हस्तकला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com