esakal | कोबीचे दर घसरले; शेतकऱ्याने कोबीवर फिरवला रोटर
sakal

बोलून बातमी शोधा

कोबीचे दर घसरले; शेतकऱ्याने कोबीवर फिरवला रोटर

कोबीचे दर घसरले; शेतकऱ्याने कोबीवर फिरवला रोटर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निरगुडसर : कोबी पिकाला सध्या कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे उभे पीक नागंरण्याची वेळ आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांवर आली आहे.आंबेगाव तालुक्यात टोमॅटो, कोबी, फ्लॅावर आदी तरकारी पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. यामध्ये कोबी, टोमॅटो या पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्यात कोबीला तर एक रुपया किलो हा दर मिळत आहे.

शेतकऱ्यांनी एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च करून पीक घेतले आहे. मात्र, सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे गुंतवलेले भांडवलही वसूल होत नाही. मजुरी, वाहतूक खर्च देखील वसूल होत नाही. त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी कोबीच्या शेतांमध्ये रोटर फिरवला आहे. नगदी पीक म्हणून कोबी मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. दीड महिन्यांपूर्वी कोबीला बाजारभाव चांगला मिळत होता. परंतु, त्यानंतर बाजारभावात मोठी घसरण होत गेली.

हेही वाचा: मोठी बातमी! 'कोव्हॅक्सिन'ला या आठवड्यात WHOची मिळणार मंजुरी

सध्या एक रुपया किलो दराने कोबी खरेदी केला जात आहे. या बाजारभावातून कोबी पिकासाठी गुंतवलेले भांडवल वसुल काढणीची मजुरी व बाजारपेठेपर्यंत नेण्याचा वाहतुकीचा खर्च देखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कोबी पिकाची काढणी थांबवली आहे. काही शेतकऱ्यांनी मेंढपाळांना बोलावून शेतामध्ये शेळ्या-मेंढ्या-जनावरे सोडली आहेत. काही शेतकऱ्यांना इतर पिके घ्यायची असल्याने त्या शेतामध्ये त्यांनी रोटर फिरवला आहे.

कोबीचे पीक घेतले होते. त्यासाठी रोपे, खते, औषध फवारणीसाठी हजारो रुपये खर्च केला. त्यातून पीकही जोमदार आले. परंतु, सुरुवातीपासूनच बाजारभाव मिळाला नाही. गुंतवलेले भांडवल अंगावर आले. त्यामुळे मी कोबीच्या पिकात रोटर फिरविण्याचा निर्णय घेतला. पिकासाठी केलेला खर्च वाया गेला आहे.

- विकास कोकणे, शेतकरी, थोरांदळे (ता. आंबेगाव)

loading image
go to top