Pune News : गटाराच्या अर्धवट कामामुळे अष्टविनायक महामार्ग बनला मृत्यूचा सापळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 accident

Pune News : गटाराच्या अर्धवट कामामुळे अष्टविनायक महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

पारगाव - आंबेगाव परीसरातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गाच्या लगत असलेल्या गटाराचे काम गेली अनेक महिने अर्धवट आहे काल रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास समोरून आलेल्या वाहनाच्या लाईट मुळे मोटारसायकलस्वार रस्त्यालगत असलेल्या उघड्या गटारात कोसळल्याने मोटारसायकल वरील कैलास कारभारी कापडी (वय ४७ वर्ष) रा. जारकरवाडी हे गंभीर जखमी झाले आहे.

हा अपघात गटाराच्या अपूर्ण कामामुळेच झाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.अष्टविनायक महामार्ग अंतर्गत रांजणगाव ते ओझर हा रस्ता पारगाव परिसरातून जात आहे.

या रस्त्याचे काम गेली वर्षभरापासून संथगतीने सुरु आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गटार लाईन काम अर्धवट असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याबाबत एक महिन्यापूर्वीच दैनिक सकाळ मध्ये बातमी प्रसिध्द झाली होती. काम पुर्ण करण्याबाबत नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही संबधित ठेकेदार अपूर्ण काम पूर्ण करत नाही.

त्यातच काल रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कैलास कारभारी कापडी मोटारसायकलवरून रस्त्यावरून येत असताना, समोरून आलेल्या वाहनाच्या लाईट मुळे श्री. कापडी यांना रस्त्यालगत असलेला उघड्या गटारीच्या खड्याचा अंदाज न आल्याने श्री. कापडी मोटारसायकलसह त्या गटारीच्या खड्यात कोसळले.

गटारीला असलेल्या उघड्या लोखंडी गजामुळे श्री. कापडी यांना गंभीर जखमा झाल्या येथील व्यवसायिक संदीप निकम, बंटी देवडे, निखील शेलोत व रमेश वारीक यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन कैलास कापडी यांना गटारीच्या खड्यातून बाहेर काढून येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

हा अपघात केवळ गटारीच्या अपूर्ण कामामुळेच झाला आहे त्यामुळे संबधित ठेकेदाराने जखमीच्या उपचाराचा खर्च करावा अशी मागणी जखमीचे भाऊ एकनाथ कापडी यांनी केली आहे.

येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते.त्यामुळे आणखीन गंभीर दुर्घटना घडू नये म्हणून गटारांचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी केली आहे.