
Pune News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कलाविष्काराच्या कार्यक्रमात शाळेसाठी ८० हजार रुपयांची देणगी
पारगाव : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथे जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत कलाविष्कार २०२३ कार्यक्रमास चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात अंगणवाडी,बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड डान्स सादर केले. ग्रामस्थ आणि पालकांनी बक्षीसातून शाळेसाठी एकूण ८० हजार रुपयांची देणगी दिली. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक हेमंत विटकर यांनी दिली.
अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कलाविष्कार २०२३ हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन कात्रज दूध संघाचे संचालक विष्णू काका हिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, गटशिक्षणाधिकारी सविता माळी,
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांताराम बापू हिंगे, सरपंच पवन हिले, विस्तार अधिकारी काळुराम भवारी, गजानन पुरी ,केंद्रप्रमुख शत्रुघ्न जाधव, साहेबराव शिंदे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश हिंगे, विद्या विकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य अंकुश शिंगाडे तसेच विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित ग्रामस्थासाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. लकी ड्रॉ ची बक्षिसे शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष गीतांजली हिंगे व माजी उपसरपंच किशोर हिंगे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड डान्स सादर केले. कार्यक्रमाची व्यवस्था मुख्याध्यापक हेमंत विटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी व शिक्षकांनी पाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा शिंगाडे यांनी केले.उदयकुमार लोंढे, गीतांजली लोंढे, सुजाता जारकड यांनी व्यवस्था पाहिली. कार्यक्रमाचे आभार राम गुरव यांनी मानले.