
चोवीस तास काम करायचे. रात्री-अपरात्री केव्हाही फोन आला की जायचे. जीवावर उदार होऊन काम करत आहोत; परंतु वेतनासाठी वारंवार फोन करून हात पसरावे लागतात.
किरकटवाडी - चोवीस तास काम करायचे. रात्री-अपरात्री केव्हाही फोन आला की जायचे. जीवावर उदार होऊन काम करत आहोत; परंतु वेतनासाठी वारंवार फोन करून हात पसरावे लागतात. अगोदरच पगार (Salary) अत्यंत कमी आहे आणि कोणत्याच महिन्यात वेळेवर पगार मिळत नाही. त्यामुळे घरखर्च भागवणे अवघड झाले आहे, अशा शब्दांत पुणे जिल्ह्यातील १८७ रुग्णवाहिका चालक (Ambulance Driver) आपल्या व्यथा व्यक्त करत आहेत. कमी असलेले वेतन तरी किमान वेळेवर मिळावे, अशी मागणी रुग्णवाहिका चालक करत आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या रुग्णवाहिकांवर सध्या १८७ चालक काम करत आहेत. दरमहा त्यांच्या खात्यावर ९ हजार ९५५ रुपये एवढे मानधन जमा करण्यात येत आहे, मात्र इतके कमी मानधन असताना तेही वेळेवर मिळत नसल्याने चालक संताप व्यक्त करत आहेत.
डिसेंबर २०२१चे मानधन अजूनही मिळालेले नाही. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता हा आरोग्य विभागाशी संबंधित विषय असल्याने आरोग्य सभापतींशी बोलण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
पगारपत्रक मिळत नाही
सध्या खात्यावर दरमहा ९ हजार ९५५ रुपये जमा केले जातात. मात्र पीएफ किती कापला जातो? पगारातून अजून कशासाठी कपात केली जाते? एकूण वेतन किती आहे? अशी कोणतीच माहिती मिळत नाही. एजन्सीकडे वारंवार मागणी करूनही पगारपत्रक मिळत नाही, असा आरोप चालकांनी केला आहे.
ज्या चालकांचे फोन आले, त्यांना फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे जमा केले जातील, असे सांगितले आहे. जुलै २०२१ पासून आम्हाला जिल्हा परिषदेकडून बिल मिळालेले नाही. तरीही आम्ही चालकांना वेतन देत आहोत. जिल्हा परिषदेत जाऊन चर्चा केली आहे. लवकरच बिल मिळेल व चालकांचे वेतन होईल.
- रणजितसिंह पाटील, संचालक, रक्षक ग्रुप
‘सीईओं’च्या आश्वासनाचे काय झाले?
काही महिन्यांपूर्वी रुग्णवाहिका चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांची भेट घेऊन वेतनवाढीची मागणी केली होती. त्या वेळी नवीन निविदा बनविण्याचे काम सुरू असून, किमान चार हजार रुपये दरमहा वेतन वाढेल, असे आश्वासन आयुष प्रसाद यांनी दिले होते. तत्कालीन एजन्सी ८ हजार ८५५ रुपये वेतन देत होती व आताची एजन्सी ९ हजार ९५५ रुपये देते. म्हणजे केवळ १४०० रुपये वेतन वाढल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल चालक उपस्थित करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.