esakal | Weekend Lockdownबाबत पुण्यात सुधारित आदेश; विद्यार्थी, लग्नसभारंभ, कर्मचाऱ्यांना सूट
sakal

बोलून बातमी शोधा

pune lockdown

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिका प्रशासनाने सोमवारपासून (ता. ५) शहरात कडक निर्बंध लागू केले.

Weekend Lockdownबाबत पुण्यात सुधारित आदेश; विद्यार्थी, लग्नसभारंभ, कर्मचाऱ्यांना सूट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेने एप्रिल महिन्याच्या दर शुक्रवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी सात या काळातील लॉकडाउनमधून (संचारबंदी) औद्योगिक कंपन्यांचे कर्मचारी, दहावी-बारावीचे विद्यार्थी तसेच पूर्व नियोजित लग्न समारंभांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तर अत्यावश्‍यक सेवेमध्ये आणखी काही व्यवसायांचा नव्याने समावेश करून त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्याबाबतचे सुधारित आदेश मंगळवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने सोमवारपासून (ता. ५) शहरात कडक निर्बंध लागू केले. त्याबरोबरच दर आठवड्याच्या शुक्रवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी सात यावेळेत लॉकडाउन लागू केला. याकाळात संचारबंदी जाहीर केली आहे. ३० एप्रिलपर्यंत हे आदेश लागू केले आहेत. मात्र, या आदेशांसंदर्भात तसेच दोन दिवसांच्या लॉकडाउनमध्ये कोणाला सवलत दिली, याबाबतचा संभ्रम नागरिकांबरोबरच व्यावसायिक आणि उद्योग-धंद्यामध्ये होता. तसेच, दहावी-बारावीच्या परिक्षा सुरू होत असून पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आज पुन्हा महापालिका आयुक्तांनी सुधारित आदेश काढून हा संभ्रम दूर केला आहे. आज काढलेल्या सुधारित आदेशात काही घटकांना नव्याने सवलत दिली आहे.

हेही वाचा - शरद पवारांनी घेतला लशीचा दुसरा डोस; म्हणाले, 'लस घेऊन सक्रिय सहभाग नोंदवा'

अत्यावश्‍यक सेवांमध्ये नव्याने समावेश
(आठवड्यातील सर्व दिवस सुरू ठेवता येणार)

 • - पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने
 • - सर्व प्रकाराच्या कार्गो/कुरिअर सेवा
 • - डेटा सेंटर/क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर/माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित पायाभूत सुविधा आणि सेवा
 • - शासकीय खासगी सुरक्षा सेवा
 • - फळ विक्रेते
 • - मटण, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने
 • - पशू वैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र व खाद्याची दुकाने
 • - सेबीची कार्यालये
 • - रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था
 • - सर्व नॉन- बँकिंग वित्तीय महामंडळे
 • - सर्व मायक्रो फायनान्स संस्था
 • - कस्टम हाऊस, एजंट्‌स, लस, औषधे, जीवन रक्षक औषधांची वाहतूक करणारी अधिकृत परवानाधारक मल्टिमोडल ट्रान्स्पोर्ट ऑपरेटर

लॉकडाउनमधून यांना वगळले
(शुक्रवार सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी सात यावेळेत)

 • - औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी आणि त्यांची वाहने (कार्यालयीन ओळखपत्र आवश्‍यक)
 • - या काळातील पूर्वनियोजित लग्न सभारंभ (पन्नास जणांच्या उपस्थितीत आणि पोलिसांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक)
 • - धार्मिक स्थळे पूर्ण बंद; परंतु दैनंदिन पूजा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परवानगी
 • - दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी (परिक्षेचे हॉलतिकीट जवळ बाळगणे आवश्‍यक)
 • - परगावावरून येणारे अथवा जाणाऱ्या प्रवाशांना (अधिकृत प्रवास तिकीट जवळ ठेवणे)
 • - शिक्षकांना शाळा-महाविद्यालयात जाण्यास परवानगी
 • - बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद यांचे कार्यालय आणि प्रकल्पाची ठिकाणे (सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सहापर्यंत)
loading image