आकाशाशी जडवा नाते!

आकाशदर्शनाला चालना मिळावी यासाठी वर्षातून दोन वेळा ‘ॲस्ट्रॉनॉमी डे’ साजरा करण्यात येतो. यावर्षी १५ मे आणि ९ ऑक्टोबर रोजी ‘ॲस्ट्रॉनॉमी डे’ साजरे करण्यात येतील.
Astronomy
AstronomySakal
Updated on

आकाशदर्शनाला चालना मिळावी यासाठी वर्षातून दोन वेळा ‘ॲस्ट्रॉनॉमी डे’ (Astronomy Day) साजरा करण्यात येतो. यावर्षी १५ मे आणि ९ ऑक्टोबर रोजी ‘ॲस्ट्रॉनॉमी डे’ साजरे करण्यात येतील. आकाशदर्शनाची मनापासून आवड निर्माण झाल्यास असे वेगळे ॲस्ट्रॉनॉमी डेज साजरे (Celebrate) करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळेच, आकाशाशी नाते जडवा आणि निसर्गाच्या या अनोख्या अविष्काराचे साक्षी बना. (Amit Purandare Writes about Astronomy)

आकाशदर्शन कधी करावे? याला काही ठरावीक नियम नाहीत. दर ऋतुमानानुसार आकाशस्थ गोष्टी बदलताना दिसतात. साधारणपणे पावसाळ्यानंतर आकाशदर्शनाला सुरुवात करावी. पावसामुळे वातावरणातील धूळ खाली बसते आणि त्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यामध्ये दिवस लहान व रात्री मोठ्या होत जातात. त्यामुळे हा काळ आकाशदर्शनासाठी वर्षातील सर्वोत्तम काळ होय. या काळात आकाशदर्शनास सुरुवात केल्यास तुमची ही आवड आयुष्यभरासाठी वृद्धिंगत होऊ शकते. ही गोष्ट मी स्वानुभवावरून सांगू शकतो. आकाशदर्शनासाठी दुर्बीण हवीच, असा एक गैरसमज आढळून येतो.

Astronomy
लोणावळा: वेब सिरीज पाहून लुटण्याची लढवली शक्कल

आकाशदर्शन हे नुसत्या डोळ्यांनी, द्विनेत्रीमधून (बायनॉक्युलर्स), तसेच दुर्बिणीच्या (टेलिस्कोपच्या) माध्यमातून करावे. नुसत्या डोळ्यांच्या व द्विनेत्रिच्या माध्यमातून आधी आकाशाशी उत्तम नाते जडवावे आणि मगच दुर्बिणीचा आग्रह धरावा. कृत्रिम उपग्रह, चंद्राच्या कला, सुंदर धूमकेतू, डोळ्यांची पारणे फेडणारा सुंदर उल्कावर्षाव, सूर्य-चंद्राची ग्रहणे, ग्रहांच्या युत्या, बुध-शुक्राची अधिक्रमणे, सौरडागांचे निरिक्षण, सूर्याच्या प्रकाशात शुक्र ग्रह शोधणे, नक्षत्रदर्शन, इत्यादी अनेक सुंदर खगोलिय घटनांचा आकाशदर्शनात समावेश होतो. उन्हाळ्यात आपल्याकडून म्हणजेच खगोलिय उत्तर गोलार्धातून आपल्या आकाशगंगेचा खूप सुंदर असा पट्टा काळोख्या ठिकाणांवरून दिसू शकतो. याला आपण ‘‘समर मिल्की वे’’ असे संबोधतो. बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी आणि अंधाऱ्या जागेवरून युरेनस हे ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतात. पाच इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या व्यासाच्या दुर्बिणीचा वापर केल्यास बुध-शुक्राच्या कला, मंगळावरील बर्फाच्या टोप्या, गुरू व त्याच्या भोवती पिंगा घालणारे त्याचे उपग्रह, शनी व त्याची विलोभनीय कडी, इत्यादी गोष्टी व्यवस्थितपणे दिसू शकतात.

आकाशदर्शन करणे म्हणजेच आपल्या भूतकाळाचा अभ्यास करणे होय. अगदी सर्वांत जवळ असणाऱ्या आपल्या चंद्रापासून ते मानवाने आत्तापर्यंत शोधलेली सर्वांत दूरची खगोलीय वस्तू आपण भूतकाळातच पहात असतो. तसेच अंतराळातील अफाट अंतरे मोजण्याकरिता आपण प्रकाशवर्ष अर्थात लाइटइयर या परिमाणाचा प्रभावीपणे वापर करतो. एका सेकंदाला तीन लाख कि.मी. एवढ्या प्रचंड वेगाने प्रवास करणारा प्रकाश एका वर्षात किती अंतर पार करून गेला त्याला एक प्रकाशवर्ष असे म्हणतात. सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीपर्यंत पोचण्यासाठी साधारणपणे ८ मिनिटे २० सेकंद लागतात. याचाच अर्थ आपण रोज ८ मिनिटे २० सेकंद जुना सूर्य बघत असतो. म्हणजेच सूर्य जर अचानकपणे प्रकाशायचा थांबल्यास आपल्याला ८ मिनिटे २० सेकंदांनी समजेल, अशा प्रकारे आपण भूतकाळात पहात असतो. आकाशदर्शन व्यवस्थित करण्यासाठी निरीक्षकाने जर ‘सेलेस्टियल कोऑर्डिनेट सिस्टिम’ योग्य पद्धतीने शिकून घेतल्यास त्याला जगभरातून कोणत्याही ठिकाणावरून आकाशदर्शन करता येऊ शकेल.

तीन हजार तारे...

पुण्याचा विस्तार झपाट्याने होत आहे. धूर, धूळ, प्रदूषण, दिव्यांचा झगमगाट यामुळे शहरी भागातून आकाशदर्शन करणे जवळपास अशक्य झाले आहे. तरीही आपल्याला रात्रीच्या आकाशात दिसणारे व्याध, अगस्ती, मित्र, स्वाती, अभिजित, डेनेब, असे २४ तेजस्वी तारे व्यवस्थितपणे दिसू शकतात. अमावस्येच्या रात्री अंधाऱ्या ठिकाणावरून आपणास जवळपास तीन हजार तारे दिसू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com