Loksabha 2019 : अमित शहांच्या बारामतीतील सभेत काळा रंग अनेकांसाठी संकट

मिलिंद संगई 
शनिवार, 20 एप्रिल 2019

अमित शहा यांच्या सभेच्या दरम्यान काळे झेंडे दाखवून निदर्शने होऊ नयेत याची कमालीची काळजी काल सुरक्षा यंत्रणांनी घेतली. त्यामुळे काळ्यारंगाचे शर्ट, काळ्या टोप्या इतकेच काय पण पाण्याच्या बाटल्या घेऊन आलेल्या काळ्या रंगाच्या पिशव्या देखील पोलिसांनी सभा ठिकाणी आणू दिल्या नाहीत.

बारामती : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या शुक्रवारी बारामतीत झालेल्या सभेमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा अतिरेक झाल्याची तक्रार काही नागरिकांनी बोलून दाखविली.
विशेषतः काळा रंग हा अनेकांसाठी संकट ठरला.

अमित शहा यांच्या सभेच्या दरम्यान काळे झेंडे दाखवून निदर्शने होऊ नयेत याची कमालीची काळजी काल सुरक्षा यंत्रणांनी घेतली. त्यामुळे काळ्यारंगाचे शर्ट, काळ्या टोप्या इतकेच काय पण पाण्याच्या बाटल्या घेऊन आलेल्या काळ्या रंगाच्या पिशव्या देखील पोलिसांनी सभा ठिकाणी आणू दिल्या नाहीत.

यामुळे अनेकांचा विरस झाला. काहीजणांनी काळे शर्ट परिधान केले होते तर काहीजणांनी काळे टी-शर्ट ....मात्र अशा सर्वांनाच पोलिसांनी सभास्थानी जाण्याची परवानगी नाकारल्यामुळे त्यांना रस्त्यावर उभे राहूनच सभा ऐकावी लागली.

अमित शहा यांच्या सभेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या काळ्या रंगाच्या वस्तूंना पोलिसांनी प्रतिबंध केल्यामुळे ही बाब घडली. सभा ठिकाणी प्रवेश करताना प्रत्येकाच्या खिशामध्ये कोणत्या रंगाचा रूमाल आहे याची देखील तपासणी पोलिसांनी केली यामधून पत्रकारही सुटले नाहीत.

मात्र अमित शहा यांची सुरक्षा विचारात घेता कोणताही धोका पत्करायचा नाही असे पोलिसांनी ठरवले असल्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेतला असल्याचा खुलासा पोलिस यंत्रणेने केला.

Web Title: Amit Shah campaign rally in Baramati