अमृतांजन पूल जमीनदोस्त; तीनशे किलो स्फोटकांचा वापर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

Amrutanjan bridge on Mumbai-Pune expressway demolished:पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील वाहतुकीस अडथळा ठरणारा ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल रविवारी जमीनदोस्त करण्यात आला.

लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील वाहतुकीस अडथळा ठरणारा ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल रविवारी (ता. ५) जमीनदोस्त करण्यात आला. इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा असणारा हा पूल अखेर इतिहासजमा झाला आहे. रस्ते विकास महामंडळाच्या वतीने तीनशे किलो नियंत्रित स्फोटकांच्या साहाय्याने हा पूल पाडण्यात आला. महामंडळाच्या वतीने मोठी खबरदारी घेत मोठी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या लॉकडाउन सुरू असल्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता द्रुतगती मार्गावर वाहतूक तुरळक असल्याने पाडण्यासाठी योग्य कालावधी होता. रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, अधीक्षक अभियंता ए. पी. नागरगोजे, कार्यकारी अभियंता आर. पी. सोनवणे, महामार्ग सुरक्षा ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान हे ठाण मांडून होते. 

अमृतांजन पूल अखेर इतिहासजमा (फोटो फीचर)

ड्रीलचा वापर 
पूल पाडण्यासाठी अत्यंत कमी कालावधी असल्याने नियंत्रित स्फोटकांच्या साहाय्याने हा पूल जमीनदोस्त करण्यात आला. यासाठी तीनशे किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. द्रुतगती मार्गाच्या मिसिंग लिंकचे काम करणाऱ्या नवयुग कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या वतीने हा पूल पाडण्यात आला. पुलाच्या चार कमानींच्या खांबावर एक मीटर अंतरावर व दोन मीटर खोल ड्रिल करण्यात आले. सर्व तपासणी करण्यात येत अखेर सायंकाळी हा पूल जमीनदोस्त करण्यात आला. 

अपघातांचा ब्लॅक स्पॉट 
द्रुतगती मार्ग हा सहा लेनचा आहे. मात्र, अमृतांजन पुलाजवळ केवळ चारच लेन उपलब्ध होतात. यामुळे याठिकाणी भरधाव वाहनांचे अपघातांचे प्रमाण जास्त होते. तसेच अरुंद असल्याने वाहतूक कोंडीही होत तोती. त्यामुळे हा पूल अपघातांसाठी ब्लॅक स्पॉट ठरत होता. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने हा पूल पाडणे गरजेचे होते. लॉकडाउनमुळे वाहतूक कमी असल्याने हा पूल तातडीने पाडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांनी दिली. या पुलाची कोनशिला ही सीएमईमधील आर्मी म्युझियममध्ये संग्रहित ठेवणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता ए. पी. नागरगोजे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amrutanjan bridge on Mumbai-Pune expressway demolished